कोणत्याही क्षेत्रात संधी मिळणे महत्त्वाचे असते. राजकारणात संधीबरोबर उत्तम मार्गदर्शनाची निकड भासते. आपल्या घरातून राजकारणाचे हे बाळकडू व उत्तम मार्गदर्शन मिळाले आणि मतदारसंघाच्या भक्कम पाठिंब्यामुळे पाच वेळा निवडून येऊ शकलो. यामुळे आपल्या मतदारसंघाच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारत असल्याची भावना ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने पुरोगामी विचारवंत माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणाऱ्या ‘कार्यक्षम आमदार’ पुरस्काराने ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.
परशुराम साईखेडकर नाटय़गृहात झालेल्या या सोहळ्यास आ. हेमंत टकले, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर, ‘सावाना’चे अध्यक्ष विलास औरंगाबादकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
५० हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गेल्या ३० ते ३२ वर्षांपासून आपण राजकारणात कार्यरत आहोत. परंतु, आजपर्यंत असा कोणताही पुरस्कार आपणास मिळाला नाही. असा पुरस्कार आपणास मिळावा, असेही कधी वाटले नाही. दुसऱ्या लोकप्रतिनिधींना तो मिळाला तर कधी खंतही वाटली नाही. नाशिकला अनेक थोर साहित्यिकांचा वारसा लाभला आहे. देशाला नाशिकने बरेच काही दिले आहे. यामुळे नाशिकसारख्या साहित्यिकांच्या भूमीत प्रथमच मिळणाऱ्या या पुरस्काराचा आनंद व समाधान शब्दात सांगता येणे अवघड असल्याचे इस्लामपूर (पूर्वीचा वाळवा) विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पाटील यांनी सांगितले. तत्पूर्वी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब शिंदे यांनी राजकारणातील स्थित्यंतराचा वेध घेतला. राजकारण तत्त्वनिष्ठ राहिले नसल्याने त्याची अवनती होत आहे. महात्मा गांधी यांनी राजकारण हे तत्त्वनिष्ठ हवे आणि शिक्षण हे चारित्र्यशील हवे असे सांगितले होते. विधायक कामांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. अशा या परिस्थितीत ‘सावाना’च्या पुरस्कार निवड समितीने जयंत पाटलांच्या माध्यमातून योग्य व्यक्तीची पुरस्कारासाठी निवड केल्याचे त्यांनी सांगितले.