विश्वास पवार, लोकसत्ता

वाई : सातारा जिल्हा परिषद म्हणजे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे हे समीकरण तयार झाले असताना राष्ट्रवादी काँग्रेसने सामान्य कार्यकर्त्यांला संधी देत प्रस्थापितांना दणका दिला आहे.

जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीसाठी गेल्या आठवडय़ांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांत बैठका सुरू होत्या. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, वाईचे आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, मंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी यासाठी दोन वेळा बैठका घेतल्या. त्या वेळी विद्यमान अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांना मुदतवाढ देण्याबरोबरच कऱ्हाडचे ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे यांना उपाध्यक्षपद देण्याचे निश्चित झाले होते. तसे वरिष्ठ पातळीवर कळवलेही होते आणि अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची औपचारिकता फक्त बाकी होती. मात्र जिल्ह्य़ातील नेत्यांची शिफारस बाजूला ठेवत शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्य़ात राजकीय समतोल राखत खंडाळा आणि खटाव तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली. वाईचे आमदार मकरंद पाटील जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांना भारी पडले. त्यांनी त्यांचे समर्थक उदय कबुले यांची अध्यक्षपदावर वर्णी लावून घेतली होती. उदय कबुले यांची झालेली निवड अनपेक्षित आणि सर्वानाच धक्का देणारी होती.

सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानंतर स्पर्धकही वाढले होते. काही झाले तरी अध्यक्ष, उपाध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार याविषयी कोणतीही शंका नव्हती.

फलटणच्या संजीवराजे नाईक निंबाळकरनाच संधी देण्याबाबत एकमत झाले होते. सातारा, फलटण, जावळी, खटाव तसेच कोरेगाव तालुक्यातील सदस्यांनीही संजीवराजेंच्या नावाला सहमती दर्शविली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पहिल्या बैठकीत ज्या चार नावांची चर्चा झाली त्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, मानसिंगराव जगदाळे, सुरेंद्र गुदगे आणि दीपक पवार यांची नावे चर्चेत होती. संजीवराजे यांनी स्वत: मागणी केली नाही परंतु त्यांचे नाव सदस्यांकडून पुढे आणले होते. उपाध्यक्षपदासाठी वाई मतदारसंघातील शिरवळ गटातून उदय कबुले आणि कोरेगावमधून प्रदीप विधाते यांचे नाव नसल्याची चर्चेत होती.

माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांची शरद पवारांचे निकटचे सहकारी म्हणून ओळख होती. त्यांचे चिरंजीव मकरंद पाटील यांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात वर्णी लागणार याची जोरदार चर्चा होती. मात्र त्यांचे नाव मागे पडले. मंत्रिपदाच्या स्पर्धेतून नाव मागे पडल्यामुळे मकरंद पाटील समर्थक कार्यकर्ते नाराज होते. कार्यकर्त्यांनी मकरंद पाटील यांना नाराजी बोलून दाखविली. मकरंद पाटील यांनीही शरद पवारांशी संपर्क साधला.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवारांनीही मकरंद पाटील यांना जिल्ह्य़ाच्या राजकारणात बढती दिल्यामुळे आणि सन्मान केल्यामुळे मकरंद पाटील हे रामराजे नाईक निंबाळकरांसह जिल्ह्य़ातील अनेकांना भारी पडले असल्याची चर्चा जिल्ह्य़ाच्या राजकारणात सुरू आहे.

विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीत सातारा जिल्ह्य़ाचे राजकारण, राजघराण्यात असणारा एकमेकांतील द्वेष, ईर्षां यामुळे पक्षाचे झालेले नुकसान. राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे केलेले नेते पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले. ते का गेले, की त्या वेळची राजकीय परिस्थिती पाहून घालवले, कोणामुळे गेले, याची माहिती शरद पवार आणि अजित पवारांना होती. विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीत प्रत्येक मतदारसंघाचा आढावा, जागा निवडून आणण्यातील अडचणी इत्यादीची इत्थंभूत माहिती मकरंद पाटील यांच्याकडून शरद व अजित पवार यांनी घेतली होती. याबाबत त्यांनी रामराजे नाईक निंबाळकर व शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा केली. मात्र या दोघांनी याकडे दुर्लक्ष केले आणि सगळे आलबेल असल्याचे पवारांना सांगितले.

सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा राष्ट्रवादीने पराभव केला. यातूनच राष्ट्रवादीच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

Story img Loader