सावंतवाडी : मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी यावरून राज्य सरकारला धारेवर धरले आहे.
या पुतळ्याची उभारणी नौदलामार्फत करण्यात आल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले असले तरी, विरोधी पक्षांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर या दुर्घटनेचे खापर फोडले आहे. या घटनेस सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली तर, रवींद्र चव्हाण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी खासदार विनायक राऊत यांनी केली. पुतळा कोसळणे, राजकीय कट असण्याची शक्यता भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी व्यक्त केली.
वाऱ्यांचा वेग की निकृष्ट काम?
मालवण समुद किनाऱ्यावर गेल्या दोन दिवसांपासून, ताशी ४५ किमी वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे हा पुतळा कोसळला, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मात्र, पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पुतळ्याच्या उभारणी आणि सुशोभीकरणावर सहा कोटींचा खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येते. हा पुतळा उभारण्यात येत असताना येथील वातावरणात दीर्घकाळ उभा राहील, अशा साहित्याचा वापर करून पुतळा उभारावा, अशी मागणी शिवप्रेमींनी केली होती, असा दावा करण्यात येत आहे.
गेटवे समोरील पुतळा ६३ वर्षे सुस्थितीत
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते २६ जानेवारी १९६३ गेटवे ऑफ इंडिया समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण झाले होते. ६३ वर्षे होऊनही समुद्र किनाऱ्यावर असणारा हा पुतळा अजूही सुस्थितीत आहे. महायुती सरकारने अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारलेला महाराजांचा पुतळा कोसळला. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले आजही भक्कम आहेत. पण २०२३ मध्ये अनावरण झालेला महाराजांचा पुतळा कोसळला. महाराजांच्या पुतळ्यातही सत्ताधाऱ्यांनी पैसे खाल्ले यासारखे दुर्दैव नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.