सत्ताधारी भाजपच्या मंत्र्यांवर होत असलेले वेगवेगळे आरोप, शेतकऱयांची कर्जमाफी आणि राज्य सरकारची धोरणे या मुद्द्यांवरून विधीमंडळाचे सोमवारपासून सुरू झालेले पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळाच्या पायऱयांवर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग अडविण्याचा प्रयत्न केला. शेतकऱयांची कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी विधान परिषदेत घोषणाबाजी केल्यामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम २८९ अंतर्गत शेतकऱयांसाठी राज्य सरकारने मदत उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी विरोधक अधिक आक्रमक असून, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी पहिल्या दिवशी हाच मुद्दा लावून धरला. फडणवीस यांनी शेतकऱयांच्या कर्जमाफीचा मुद्दा फेटाळून लावला असल्यामुळे अधिवेशनाच्या काळात हाच मुद्दा आणखी तीव्रतेने मांडण्याची रणनिती विरोधकांनी आखली आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी याच मुद्द्यावरून विरोधकांनी फडणवीस यांचा मार्ग अडविण्याचा प्रयत्न केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कॉंग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी सुद्धा शेतकऱयांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांचे आगमन होताच विरोधकांनी कर्जमाफीच्या बाजूने घोषणा देण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या आगमनावेळी विरोधकांनी कथित चिक्की घोटाळ्याच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.
शेतकऱयांच्या कर्जमाफीवरून विधान परिषदेत गोंधळ, कामकाज तहकूब
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळाच्या पायऱयांवर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग अडविण्याचा प्रयत्न केला.
First published on: 13-07-2015 at 01:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition aggressive over demand of loan waiver to farmers