एकनाथ शिंदे-भाजपा सरकारने नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. उद्धव ठाकरे म्हणाले की, “बजेटला पंचामृत असं नाव दिलंय, याचाच अर्थ हातात पडेल ते घ्या.” अशा शेलक्या शब्दात उद्धव ठाकरे यांनी टीका केल्यानंतर यावर आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, “आमचा अर्थसंकल्प हा लोकाभिमूक आहे.”
मुख्यमंत्री म्हणाले की, “अर्थसंकल्पावर काय बोलायचं हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. कारण हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. आम्ही पंचामृत आणलंय. यावर बोलण्यासाठी आम्ही विरोधकांना जागाच ठेवलेली नाही. मग त्यांनी (उद्धव ठाकरे) प्रश्न उपस्थित केला की पैसे कुठून आणणार आता तर निवडणुका पण लागणार आहेत. तर आता लवकर निवडणुका लागतील, याचा अर्थ आमचा अर्थसंकल्प लोकाभिमूक आणि सर्वसमावेशक आहे.”
हे ही वाचा >> शिंदे गटाला मान्यतेचा आदेश अर्धन्यायिक अधिकारात, सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाचे शपथपत्र
पंचामृत ग्लासभरून मिळत नाही : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले होते की, “अर्थसंकल्पाला त्यांनी पंचामृत असं नाव दिलं आहे. पंचामृत हे कोणी ग्लासभरून लस्सीसारखं पित नाही. पंचामृत म्हणजे थोडं-थोडं दिलं जातं. त्याने पोट भरत नाही. मिळेल तेवढं प्यायचं आणि डोक्यावरून हात फिरवायचा. या सरकारने थोडंसं पंचामृत सरकारी कर्मचाऱ्यांवर तरी शिंपडायला हवं होतं.”