हिंगोली लोकसभा मतदारसंघात राजीव सातव यांचा विजय जाहीर झाल्यानंतर िहगोली, कळमनुरी आदी ठिकाणी समर्थकांनी जल्लोष केला. एकीकडे मोदी लाट, तसेच राष्ट्रवादीच्या बडय़ा मंडळींनी विरोधात प्रचार करूनही सातव यांचा विजय लक्षणीय ठरला. त्यामुळेच विरोधकांचा चांगलाच हिरमोड झाला.
या मतदारसंघात १९९८ पासून एकदा काँग्रेस व दुसऱ्यांदा शिवसेना अशी विजयाची परंपरा या वेळीही कायम राहिली. या वेळी देशात सर्वत्र मोदी लाट असतानाही सेनेला ही जागा राखता आली नाही. सातव यांना ४ लाख ६७ हजार ६९७, तर सेनेचे सुभाष वानखेडे यांना ४ लाख ६५ हजार ७६५ मतदान झाले. सातव यांचा निसटत्या विजयाने या मतदारसंघात आळी-पाळीने विजयाची परंपरा कायम राहिली.
सातव यांचा विजय जाहीर होताच समर्थकांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. आमदार भाऊ पाटील गोरेगावकर, प्रदीप नाईक, जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह समर्थक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शहराच्या अनेक भागात फटाके फोडून विजयाचा जल्लोष करण्यात आला. शनिवारी कळमनुरीत ठिकठिकाणी सातव समर्थकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. स्वागताला उत्तर देताना सातव यांनी हा विजय सामान्यांचा असल्याचे सांगून मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
सातव यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीच्या बडय़ा नेत्यांनी जीव ओतून सेनेसाठी काम केले. माजी खासदार शिवाजी माने यांनी तर उघडपणे सेनेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन दुचाकी रॅली काढून सातव यांचा पराभव करण्याची भीमगर्जना केली होती. त्यासाठी िहगोली, सेनगाव, कळमनुरी, वसमत आदी भाग िपजून काढला. मात्र, सातव यांच्या झालेल्या विजयामुळे राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांचा हिरमोड झाला.
माने यांनी तर उघडपणे आमचे ताट ओढून घेतल्याने सातव यांचा पराभव करण्याच्या हेतूनेच उघडपणे शिवसेनेचे काम केल्याचे सांगून पक्षाला गरज असेल तर मला पक्षात ठेवावे किंवा नाही? याचा निर्णय पक्षश्रेष्टी घेतील, असे आव्हान दिले. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद, तसेच पक्षाचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे ते मानले जात असल्याने सातव यांच्या पराभवासाठी राष्ट्रवादीच्या काही पुढाऱ्यांनी विरोधात झटून काम केले. मात्र, किनवटचे आमदार प्रदीप नाईक व आमदार जयप्रकाश दांडेगावकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुनिर पटेल, सेनगावचे अप्पाराव देशमुख, िहगोलीचे उपनगराध्यक्ष शेख निहालभय्या यांनी आघाडीचा धर्म पाळत सातव यांच्यासाठी परिश्रम घेतले. दुसरीकडे सेनेच्या काही पुढाऱ्यांनीही सातव यांच्या विजयासाठी पडद्यामागून परिश्रम घेतले. अटीतटीच्या विजयात त्यांचाही सिंहाचा वाटा ठरल्याचे बोलले जात आहे.

Story img Loader