भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करण्यात यावे, या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केलेल्या विधानाचे पडसाद आज विधिमंडळ परिसरातही उमटले. भाजपचे नेते व मंत्री, अशी वक्तव्ये करून देशात दुहीचे वातावरण निर्माण करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ घोषित करण्यात यावे, अशी मागणी दिल्लीतील एका कार्यक्रमात रविवार केली होती. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी भाजप असे मुद्दे पुढे आणून धार्मिक आधारावर ध्रुवीकरण करीत असल्याची टीका केली. दुष्काळ, शेतकरी आत्महत्या किंवा विकासाच्या प्रश्नांचे अनेक विषय असताना असे विषय उकरून काढणे चुकीचे असून भाजप आपली ‘संघपुरस्कृत भगवीकरणाची’ नीती राबवत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी भाजप धार्मिक विद्वेष निर्माण करत असल्याचा आरोप केला. भारत धर्मनिरपेक्ष देश आहे. प्रत्येक धर्माचा ग्रंथ वेगळा आहे व त्या त्या धर्मियांची आपल्या धर्मग्रंथांवर श्रध्दा आहे. याचा अर्थ प्रत्येक धर्माने आपलाच ग्रंथ राष्ट्रीय ग्रंथ व्हावा, अशी मागणी करावी काय, असा सवाल त्यांनी केला. भाजपचे नेते असे एक एक मुद्दे काढून सामाजिक वातावरण बिघडवतात व स्वत: मजा बघत बसतात. समाजात दुही निर्माण करणारी वक्तव्ये करणे भाजपच्या नेत्यांना शोभणारे नाही व याचा आम्ही तीव्र विरोध करू, असे आव्हाड म्हणाले. एमआयएमचे इम्तियाज जलील यांनीही पत्रकारांशी बोलताना भाजपवर टीका केली.

Story img Loader