शिवसेना ( शिंदे गट ) नेते, मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सरकारमध्ये सामील होण्याची खुली ऑफर दिली आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी ‘अजित पवारांकडे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहतो,’ असं विधान केलं आहे. यावर अजित पवार यांनी मिश्कील टीप्पणी केली आहे.
अनिल पाटील काय म्हणाले?
“अजित पवार आता विरोधी पक्षनेते आहेत. पण, येणाऱ्या काळात ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून अजित पवार यांच्याकडेच पाहतो,” असं वक्तव्य अनिल पाटील यांनी अजित पवार यांच्यासमोर केलं होतं.
यावर बोलताना अजित पवारांनी म्हटलं की, “चांगले दिवस राज्यातील जनतेला दाखवायचे आहेत, त्यासाठी जास्तीत-जास्त आमदार निवडून आणायला पाहिजेत. मी काल धुळ्याला आणि नंदूरबारला होतो. तिथे एकही राष्ट्रवादीचा आमदार नाही. जळगावात एकच आमदार निवडून आला. साहेबराव होते, तेव्हा सहा आमदार होते आणि आता एकच आमदार आहे.”
“कसं चालायचं? कसा मुख्यमंत्री व्हायचं. नुसतं मुख्यमंत्री झालाच पाहिजे… अरं कशाचा झाला पाहिजे… मी माझ्या जिल्ह्यातून १० आमदार निवडून आणणार… पण, एक वर्षाहून अधिक काळ आपल्या हातात आहे. प्रयत्नांशी परमेश्वर असं नेहमीच आपण ऐकलं आहे. त्यामुळे तुम्ही तो विचार करावा. आम्ही महाविकास आघाडी मजबूत करत आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.