विधानसभा निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात राजकीय कलगीतुरा पाहायला मिळण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी वर्तवली होती. अपेक्षेप्रमाणे यंदाच्या अधिवेशनात सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यात अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पानंतर विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्तानेही राजकीय वातावरण तापल्याचं दिसून आलं. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या भाषणातून त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोले लगावल्याचं दिसून आलं.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
विजय वडेट्टीवार यांनी भाषणामध्ये लोकसभा निवडणूक निकालांचा उल्लेख केला. तसेच, सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या घोषणा म्हणजे ऋण काढून सण साजरा करण्यासारखा प्रकार असल्याची टीका त्यांनी केली.
“महायुती सरकारनं राज्याची तिजोरीच साफ केली आहे. तिजोरीत पूर्णपणे खडखडाट करून ठेवलाय. कर्ज काढून घर बांधणं मी समजू शकतो. पण माणसाला उपाशी ठेवून घर सजवणं हा नवा प्रकार या सरकारनं सुरू केला आहे. लोकसभा निवडणुकीत यांची चांगली जिरवली ना, म्हणून हे वठणीवर आलेत. दोन-चार योजना आणल्या तेही कर्ज काढून. फार बोलत होते, ४४-४५ येणार. घ्या अंबाडीचा भुरका. म्हणे ४४ आणि ४५. जिरवले ना. फार सांगत होते इतके येतील, तितके येतील. आलेत आणि मग बहिणीची आठवण झाली. तेही जाताजाता”, अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं.
वर्षभरापूर्वी बहिणीची आठवण का आली नाही?
दरम्यान, अजित पवारांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातही विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. “वर्षभरापूर्वी बहिणीची आठवण आली नाही का? सरकारचा कार्यकाळ संपताना बहीण सुचली. कारण महाराष्ट्राच्या जनतेनं यांची जिरवली. व्वा रे. यांचं रामभरोसे हिंदू हॉटेल बंद झालं. रामाचं नावच घेऊ शकत नाहीत. कारण अयोध्येत कुचकून कुचकून मारलंय यांना. साफ करून टाकलं. रामटेकमध्ये काय दाखवत होते तर धनुष्यबाण. तिथे जिरवलं. रामेश्वरममध्येही जिरवलं. चित्रकूटमध्येही जिरवलं. भगवान रामही म्हणाले. माझं नाव घेऊन मतं मागता, माझ्या नावावर राजकारण करता. बजरंगबली उभा राहिला, काढली गदा आणि यांची पाठ सुजेपर्यंत मारलं. म्हणून आता हे वठणीवर आले आहेत. म्हणून नवीन योजना सुरू केल्या”, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यावर केली.
“२०२३-२४ मध्ये राज्यावर ७ लाख ११ हजार कोटींचं कर्ज होतं. यावर्षी १ लाख ३० हजार कोटींचं कर्ज काढत आहेत. ऋण काढून सण साजरा करणारे तुम्ही आहात. महाराष्ट्र हे बघतोय. मला अपेक्षा होती की राज्यपालांचं भाषण फार गांभीर्याने होईल. पण त्या भाषणात तसं काही नव्हतं”, असं वडेट्टीवार म्हणाले.
विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार विजयी; पाच अधिकची मते कोणाची?
“मुख्यमंत्री खोटं बोलणारे नव्हते, पण…”
“मुख्यमंत्री फार खरं बोलणारे होते. एवढं खोटं बोलत नव्हते. पण दिल्लीच्या सवयीमुळे हे असं झालंय. राज्यपालांच्या भाषणावरच्या भाषणाची गाडी सुसाट होती, पण ट्रॅक सोडून चालली होती.मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी शिंदे गटाचे सगळे लोक गंभीर होते, पण भाजपाचे लोक जोरात हसत होते. त्या भाषणाला हास्यजत्रेचं स्वरूप होतं. इथून गाडी थेट नेहरूंपर्यंत घेऊन गेले. तिथून युक्रेन आणि रशियाच्या युद्धापर्यंत घेऊन गेले. जे मणिपूर शांत करू शकले नाहीत, त्यांच्या नावाने युक्रेन-रशिया युद्धबंदीपर्यंत ते गेले”, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्या भाषणातून लगावला.