ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी एकाच दिवशी अब्जावधी रुपयांच्या खरेदीचे आदेश देणे संशयास्पदच आहे. यात आता एसीबीने लक्ष घातले आहे, पण आपणही याबाबतची माहिती मागवली असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
विखे म्हणाले, केंद्र व राज्यातही आता घोटाळे बाहेर येऊ लागले आहे. पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी ‘भ्रष्टाचार करणार नाही आणि करूही देणार नाही’ अशी प्रतिज्ञा घेतली होती, त्याचे मोठे भांडवलही केले होते. मात्र आता ‘मी बोलणार नाही आणि कोणाला बोलूही देणार नाही’ अशी त्यांची अवस्था झाली आहे. मुंडे यांच्या खात्यात एवढे अध्यादेश निघाले, यात कोणी अधिकारी जबाबदार असेल तर त्यालाही निलंबित केले पाहिजे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांच्या निदरेषत्वाचे समर्थन केले आहे. मात्र हे त्यांचे कामच आहे, असे विखे म्हणाले. राज्यातील दोन-तीन मंत्र्यांचे ‘स्टिंग’ आपल्याकडे आले आहे. त्यावर विधानसभेच्या येत्या अधिवेशनात धमाका करू, असा इशाराही त्यांनी दिला.
राज्यात सध्या दारूबंदीचा विषय गाजतो आहे. सन १९७८ मध्ये राज्य सरकारने ८ साखर कारखान्यांना हे परवाने दिले. त्यात आमच्या कारखान्याचाही समावेश आहे. मात्र आम्ही काही हातभट्टी किंवा बेकायदा दारू विकत नाही, असे विखे यांनी स्पष्ट केले. चंद्रपूरला आता दारूबंदी झाली आहे, मग तेथे आता दारू मिळतच नाही का, असा सवाल त्यांनी केला. दारूबंदी करायचीच असेल तर तसा धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे. त्यासाठी व्यापक बैठका घेतल्या पाहिजे. यात साखर कारखान्यांचा विषय आला तर सरकार त्यांना नुकसान भरपाई देणार का, असाही सवाल विखे यांनी केला.
‘ऊर्जा खात्याची माहिती देणार’
मागच्या राज्य सरकारच्या काळातील ऊर्जा खात्याच्या कारभाराची चौकशी सुरू आहे. यात आपल्यालाही माहिती देण्याचे पत्र आले असून आपण ही माहिती देणार आहोत, असे विखे म्हणाले. त्या वेळी आत्ताच्या सत्ताधा-यांनीही या विषयावर आवाज उठवला होता. त्यांनीही आता ही माहिती दिली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.