राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याचं पाहायला मिळालं. विधानसभेत काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या वेतनवाढीचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्द्यावरून गिरीश महाजन व यशोमती ठाकूर यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. यावर भाष्य करताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संतप्त भूमिका घेत थेट सत्ताधाऱ्यांना इशाराच दिला!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

विधानसभेच्या कामकाजादरम्यान यशोमती ठाकूर यांनी अंगणवाडी सेविका व त्यांच्या मदतनीसांचे पगार अनुक्रमे १० हजार व १५ हजार करण्यासंदर्भात मागणी केली. “अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणाऱ्या शासनाच्या माध्यम आहेत. मदतनीसांना १० हजार आणि अंगणवाडी ताईला १५ हजार रुपये वेतनवाढ मिळायला हवी”, असं त्या म्हणाल्या. मात्र, त्यांच्या या मागणीवर मंत्री गिरीश महाजन चांगलेच संतापले.

“यशोमतीताई आपणही या खात्याच्या मंत्री होतात. तेव्हा तुम्ही हे का नाही केलं? नुसता प्रस्ताव पाठवला नाही, प्रत्यक्ष करायला पाहिजे. खात्यात पैसे गेले पाहिजेत. तुम्ही तेव्हा काहीच केलं नाही. यांनी अडीच वर्षं सरकार असताना काहीही केलं नाही. आमच्या काळात अंगणवाडी सेविकांना ८ हजारांवरून १० वेतन हजार केले. मदतनीसांना ६ हजारांवरून ८ हजार वेतन केले”, असं गिरीश महाजन म्हणाले.

“…मग एवढं का झोंबतंय?”

या मुद्द्यावरून गिरीश महाजन व यशोमती ठाकूर यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं. “कालपासून टाईमपास करतायत”, अशी टिप्पणी ठाकूर यांनी करताच गिरीश महाजन यांनी त्यावरही संतप्त भाष्य केलं. “तुमचं सरकार असताना तुम्ही काय केलं? आम्ही वाढ करूनही तुम्ही प्रश्न विचारता. मग तुम्ही काय केलं असं विचारलं तर एवढं का झोंबलं? आपण सदनाच्या ज्येष्ठ सदस्या आहात. हा विषय माझा नसताना तुम्ही मला कशाला प्रश्न विचारता? पैसे वाढवूनही ‘खोटं बोलतात’ असं कशाला म्हणता? हे योग्य नाही”, असं महाजन म्हणाले.

यावर ठाकूर यांनीही आक्रमक प्रत्युत्तर दिलं. “हे वारंवार काय म्हणतायत अडीच वर्षं आम्ही काय केलं? कोविड होता. आख्ख्या महाराष्ट्रानं ते पाहिलंय. महिलांना मानसन्मान देण्याची संस्कृती यांची नाही. महिलांनी घरी बसलं पाहिजे अशी यांची संस्कृती आहे. सभागृहात येऊन हे ताईसाहेब बोलतात. पण मागे काय बोलतात हे मला माईकवर बोलता येत नाहीये”, अशा शब्दांत यशोमती ठाकूर यांनी निषेध नोंदवला.

“मंत्र्यांना एवढं चिडायची काय गरज होती?”

दरम्यान, एवढा वेळ हा वाद पाहात असलेले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यावर संतापले. “मंत्री गिरीश महाजन उत्तर देत होते, तेव्हा यासंदर्भातली हरकत यशोमती ठाकूर यांनी घेतली. त्यांचे शब्द तपासून पाहा. मंत्रीमहोदयांना सभागृहात एवढं चिडायची काय गरज होती? तुम्ही काय सांगताय? काय दिलं तेवढंच मांडा”, असं वडेट्टीवार म्हणाले. तेवढ्यात सत्ताधारी बाकांवरून कुणीतरी टिप्पणी केली असता वडेट्टीवार त्या आमदारांवर संतापले.

“हे बघा, तुम्ही बोलू नका. ही पद्धत नाही. हे सभागृग याच्यासाठी नाहीये. मी जर बोललो तर मग बेक्कार होईल. उगीच कशाला बोलता? महिलांचा सभागृहात सन्मान आहे की नाही? एखाद्या मुद्द्यावर महिला सदस्य बोलल्या, तर त्यावर लगेच मंत्र्यांनी उसळून त्यांना अपमानजनक बोलायची आवश्यकता नव्हती. त्या खोटं बोलल्या म्हणता. कधी खोटं बोलल्या त्या? एक शब्द जरी खोटं बोलल्या असतील, तर रेकॉर्डवरून काढून टाका, माफी मागतील त्या. अंगणवाडी सेविकांना न्याय मिळावा हा मुद्दा फक्त त्यांनी मांडला”, असं वडेट्टीवार म्हणाले.

“तुम्ही तुमच्या सरकारमध्ये काय केलं? असं विचारता. आम्ही बेईमानी करून पक्ष फोडला काय? पक्ष फोडलात तुम्ही. तुमची ताकद नव्हती सत्तेत यायची. दोन दोन पक्ष फोडले”, असंही वडेट्टीवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition leader vijay wadettiwar angry over girish mahajan targeting yashomati thakur in winter session pmw