निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधक राजकारण करत आहेत. खरेतर २०१५-१६ या वर्षात आत्तापेक्षाही भीषण दुष्काळी स्थिती होती. त्यावेळी विरोधी पक्षाचा एकही नेता फिरकला नाही असे म्हणत कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांनी विरोधकांना लक्ष्य केले.
तसंच गेल्या अनेक वर्षांपासून वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी मंडळ स्थापन करावे अशी मागणी होत होती. याबाबत लवकरच मंडळ स्थापन केले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. ते पंढरपूर मध्ये बोलत होते.
कामगार मंत्री संभाजी निलंगेकर हे बुधवारी पंढरपूर येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी प्रांताधिकारी सचिन ढोले आणि इतर अधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना निलंगेकर म्हणाले की,राज्यातील कामगारांची नोंदणी सुरु आहे. यामध्ये ऊस तोड कामगार,साखर कारखान्यातील कामगार आदींची नोंद घेणे अंतिम टप्प्यात आले आहे. ही नोंदणी झाल्यावर अशा कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळेल असे त्यांनी यावेळी सांगितले.
दुष्काळाबाबत विरोधक सरकारवर टीका करीत आहे असे विचारले असता मंत्री निलंगेकर यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. २०१५ – १६ रोजी भीषण दुष्काळ पडला होता. लातूर शहराला रेल्वेने पाणी देण्याची महत्वाची भूमिका या सरकारने बजावली होती.त्यावेळेस एकही नेता फिरकला नाही आणि आता फिरतोय असे म्हणत निलंगेकर यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य केले.
गेल्या अनेक वर्षापासून वृत्तपत्र विक्रेते कल्याणकारी मंडळ स्थापन करावे अशी मागणी करीत होते. याबाबत नुकतीच मुंबईत उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि माझी बैठक झाली. यामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्या बाबत निर्णय घेण्यात आला. तसेच या बाबत एक सल्लागार परिषद येत्या अधिवेशनापूर्वी स्थापन करणार आहेओत. तसेच याची अधिसूचना देखील काढणार असल्यची घोषणा मंत्री निलंगेकर यांनी केली. दरम्यान,मंत्री निलंगेकर यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. गुरुवारी ते उस्मानाबादला रवाना होणार आहेत.