विरोधी पक्षनेते विखे यांची टीका
राज्य सरकारमध्ये संदिग्धता निर्माण झाली आहे. सरकारमध्ये सहभागी झालेले दोन प्रमुख पक्षच एकमेकांना शिव्या देत आहेत, त्याचा परिणाम सरकारी यंत्रणेवर झालेला आहे. यंत्रणा दुष्काळात कच खाताना दिसते. सरकार राहते की जाते, याबद्दल यंत्रणेलाच विश्वास वाटेनासा झाला आहे, असा जोरदार हल्ला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला.
जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हा काँग्रेस समितीच्या कार्यालयात आज, मंगळवारी, दुष्काळामुळे ग्रामीण भागात पाणी साठवणुकीसाठी टाक्यांचे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. विखे यांच्या हस्ते या टाक्यांचे वितरण करण्यात आले, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, प्रदेश सरचिटणीस नंदकुमार झावरे व विनायक देशमुख, हेमंत ओगले, सभापती बाबासाहेब दिघे आदी उपस्थित होते.
राज्य सरकार दुष्काळ निवारणाच्या कामात अपयशी ठरल्याने काँग्रेसच्या वतीने प्रत्येक जिल्हय़ात जागर अभियान सुरू केले जाणार असल्याची माहिती विखे यांनी दिली. काँग्रेसच्या आंदोलनामुळेच राज्य सरकारने जनावरांसाठी छावण्या सुरू केल्या, तसेच कर्जमाफीच्या मुद्यावर आधी नकार देणाऱ्या सरकारची, योग्य वेळ येताच कर्जमाफी करू, अशी भाषा बदलली, असा दावाही त्यांनी केला.
दुष्काळाच्या उपाययोजनांबाबत सरकार पूर्णत: अपयशी ठरल्याचा आरोप करून विखे म्हणाले, की सलग तीन-चार वर्षे दुष्काळ जाणवत असताना यंदा उपाययोजनांत काही मूलभूत बदल करण्याची, मोफत भोजनालयांसारख्या उपाययोजनांची आवश्यकता भासते आहे, परंतु सरकार काही करताना दिसत नाही, केवळ घोषणा करत आहे.
पंतप्रधान मुंबईत येतात, मात्र तीव्र तुष्काळ असलेल्या मराठवाडय़ात जात नाहीत, त्यांचे तेथे जाणे कर्तव्यच होते, आपण सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे नेऊ असा प्रस्ताव आपण सरकारला दिला होता, त्यावरही काही उत्तर नाही, याकडे विखे यांनी लक्ष वेधले. शरद पवार यांनी सहकारी साखर कारखान्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात दुष्काळासाठी निधी द्यावा, अशी सूचना केली, याकडे लक्ष वेधले असता, विखे यांनी पवार यांची सूचना चांगली असली तरी सरकारला पैसा कशासाठी द्यायचा, असा प्रश्न करत, कारखाने आपल्या कार्यक्षेत्रात उपाययोजना करतच असतात, असे स्पष्ट केले. सरकार सहकारी चळवळीला मारक निर्णय घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.
जिल्हा युवक काँग्रेसने साई सोशल फाऊंडेशन, भारती विद्यापीठ ट्रस्ट, फिरोदिया ट्रस्ट, रोट्रॅक्ट क्लब पुणे, मराठवाडा मित्रमंडळ, नारायण धवन चॅरिटेबल ट्रस्ट व दानशूर व्यक्तींच्या मदतीने सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीच्या, १ हजार लीटर क्षमतेच्या सुमारे ८० टाक्यांचे वितरण केल्याची माहिती नगर दक्षिण लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमंत ओगले यांनी दिली. या कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते विखे यांनी सरकार काहीच करत नसल्याने काँग्रेसने नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, प्रसंगी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन केले.