चार राज्यांनी काँग्रेसविरोधी कौल दिल्यामुळे उत्साहित झालेल्या भारतीय जनता पक्षासह मनोबल वाढलेले इतर विरोधी पक्ष आजपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आघाडी सरकारवर हल्ला करण्यास सज्ज झाले आहेत. एकजूट दाखवून विरोधी पक्ष सरकारला कोंडीत पकडण्यात यशस्वी होतात की, त्यांच्यातील न्यून शोधून सरकार त्यांची अस्त्रे निष्प्रभ ठरवतात, हे या दोन आठवडय़ात पाहायला मिळणार आहे.
अधिवेशन विदर्भात होत असल्याने प्रामुख्याने विदर्भातील समस्यांवर भर देण्याचा इरादा विरोधी पक्षांनी बोलून दाखवला आहे. या अधिवेशनात सरकारला अडचणीत आणणारे अनेक मुद्दे विरोधकांकडे आहेत. विदर्भातील बहुतांश भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले. मात्र, नुकसानग्रस्त शेतक ऱ्यांना सरकारकडून मदत मिळाली नाही, याबाबतची नाराजी सभागृहात प्रकट होणार, हे निश्चित आहे. शेतक ऱ्यांच्या आत्महत्या वाढण्यासाठी हेही एक कारण असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
प्रादेशिक असमतोल निश्चित करण्यासाठी सरकारने विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. ही समिती विदर्भाच्या हिताच्या विरोधात अहवाल देणार असल्याचा समज झाल्यामुळे हा अहवाल लवकर जाहीर करावा, अशी मागणी विरोधक करण्याची शक्यता आहे. राज्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये फार मोठय़ा प्रमाणावर घोटाळे झाल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सरकारने नेमलेल्या विजय चितळे समितीचा अहवालही याच अधिवेशनात मांडावा याकरता विरोधक सरकारवर दबाव आणण्याच्या तयारीत आहेत.
तापणारे मुद्दे
आदर्श अहवालाचा गोंधळ
दाभोलकर हत्याप्रकरण
जादूटोणाविरोधी विधेयक
टोलचा प्रश्न
ऊर्जा क्षेत्रातील ७३ हजार कोटींचा घोटाळा
महिला व दलितांवरील वाढते अत्याचार
शेतमालाला वाढीव भाव
दुष्काळग्रस्तांना मदत

Story img Loader