राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. गेल्या वर्षभरात राज्याच्या राजकारणात दोन मोठे भूकंप झाले. शिवसेनेत शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर हिवाळी अधिवेशन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरले होते. अजित पवार, आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत हे दोन्ही अधिवेशन गाजवले होते. तर, विधान परिषदेत अमोल मिटकरी, अंबादास दानवे यांनी जोरदार बॅटिंग केली होती. परंतु, महाविकास आघाडीच्या बाजूने आक्रमक ठरलेले सदस्य आता सरकारमध्ये सामील झाल्याने यंदाचे पावसाळी अधिवेशन गाजेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाआधी आज सत्ताधारी पक्षाने चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला आहे. बहिष्कार घालण्यामागचे कारणही विरोधी पक्षाने आज पत्रकार परिषद घेऊन विषद केले.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे, शिवसेनेचे अंबादास दानवे आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अंबादास दानवे म्हणाले की, “ठाकरे गट, शेकाप, सपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सर्व पक्षांनी बैठक घेऊन घटनाबाह्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर स्वारस्य नसल्याचं आम्ही कळवले आहे. अर्थात आम्ही चहापानावर आम्ही बहिष्कार घातलेला आहे.”
शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विक्रम घडलाय
“शेतकऱ्यांची परिस्थिती पाहिली. मागच्या अधिवेशनात कांद्याला ३५० रुपये जाहीर केले होते. परंतु, शेतकऱ्याला एक रुपयाचंही अनुदान मिळालेलं नाही. शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशनही रद्द करण्यात आले आहेत. कापसाचा दर १२ हजार होता तो ६ हजार रुपायंवर आला. चांगला भाव मिळेल या आशेने अनेक शतेकऱ्यांनी कापसाचा साठा करून ठेवला आहे. अतिवृष्टी आणि सततचा पावसासाठी सरकारने निधी जाहीर केला होता, तो निधीही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. सततच्या पावसामुळे एनडीआरएफच्या दुप्पटीने मदत करणार अशी घोषणा सरकारने केली होती. परंतु, अद्याप एकटीनेही निधी, पैसा, अनुदान मिळालेलं नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विक्रम घडतोय की काय एवढ्या आत्महत्या झाल्या आहेत. साडे बाराशेच्यावर आत्महत्या घडल्या आहेत. मुख्यमत्र्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणं ही माझी प्राथमिकता असेल. परंतु, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रतही आत्महत्या झाल्या आहेत. कोकणताही चार आत्महत्या झाल्या आहेत. प्राथमिक अपेक्षा पूर्ण करण्यातच सरकार अपयशी ठरलं आहे. शेतकऱ्यांच्या विरोधातील हे सरकार आहे”, असा हल्लाबोल अंबादास दानवे यांनी केला. त्यामुळे शेतकरी आत्महत्या आणि उत्पादनाला न मिळणाऱ्या हमीभावाचा मुद्दा यंदा अधिवेशात गाजण्याची शक्यता आहे.
कायदा सुव्यवस्था धाब्यावर
“राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक खून घडले आहेत. माता भगिनींवर अत्याचार झाले आहेत. हॉस्टेलवर बलात्कार करून तरुणीचा खून झाला. मीरा रोडमध्ये सहाने नावाच्या इसमाने महिलेची हत्या केली, पुण्यातील राजगड येथे एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तरुणीची हत्या झाली, एका तरुणीवर भर रस्त्यात कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न झाला. नागपूरला मी मागच्या आठवड्यात गेलो होतो, तेव्हा मला कळलं की तिथे गावठी कट्टे विकण्याचं सर्वांत जास्त प्रमाण नागपूरमध्ये आहे. सरकार पुरस्कृत जातीय दंगली घडल्या आहेत. या दंगली सरकारने घडवल्या आहेत की काय अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहेत. सरकारच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. महसूल मंत्र्यांनी मित्तल टॉवरमध्ये बसून बदल्या होतात, असे विविध आरोप अंबादास दानवे यांनी केले आहेत.