राज्यातील सर्वात मोठय़ा कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संचालक मंडळाच्या निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील यांची सत्ता राजर्षी शाहू आघाडी आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे, शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजय मंडलिक यांच्या आघाडीमध्ये सामना रंगणार असल्याचे बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले. सत्तारूढ गटाने सावध पावले टाकत विरोधकांच्या हाती नाराज उमेदवारांची फौज जाऊ नये याची दक्षता घेतली, तर माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह नाराज उमेदवारांना आपल्याकडे खेचण्याच्या हालचाली विरोधी गटाकडून सुरू होत्या. सत्तारूढ गटाने तिघा संचालकांना वगळले असून, ६ नवे चेहरे सादर केले आहेत. तर विरोधी गटाने नाराजांची जुळवाजुळव करून आघाडी जाहीर करण्याचा मनसुबा ठेवला आहे.
राज्यातील प्रमुख दूध उत्पादक संघामध्ये गोकुळचा समावेश केला जातो. या संस्थेच्या संचालकपदाची मलई मिळवण्यासाठी जिल्ह्यातील राजकीय धुरीणांच्या कसरती सुरू असतात. सध्या गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या हालचाली सुरू असून त्या वेळी याचा प्रत्यय येत आहे. गेले महिनाभर गोकुळच्या मुद्यावरून जिल्ह्याचे राजकारण तापले होते. आमदार महाडिक यांच्या वर्चस्वाला त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी सतेज पाटील यांनी आव्हान दिले हाते. यामुळे सावध होऊन महाडिक व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी बुधवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शेवटच्या टप्प्यात उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.
महाडिक पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ गट राजर्षी शाहू सहकार आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या आखाडय़ात उतरत आहे. मागील संचालक मंडळात सतेज पाटील गटाचे बाबासाहेब चौगुले हे संचालक होते. चौगुले यांच्यासह निवास पाटील, दिनकर कांबळे, माजी आमदार संजय घाटगे यांच्या पत्नी अरुंधती घाटगे यांना वगळण्यात आले आहे. तर गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या स्नुषा जयश्री पाटील, सदानंद हत्तरगी, उदय निवास पाटील, बाळासाहेब खाडे, राजेश पाटील या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. अरुण नरके, विद्यमान अध्यक्ष दिलीप पाटील, रंजित पाटील, विश्वास पाटील, रवींद्र आपटे, अरुण डोंगळे, दीपक पाटील, धर्यशील देसाई, सुरेश पाटील व पी. डी. धुंद्रे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवण्यात यश आले आहे. सदाशिवराव मंडलिक यांचे व्याही असलेले नरसिंग पाटील यांचे सुपुत्र राजेश पाटील यांना उमेदवारी देऊन मंडलिक गटाची हवा काढण्याचा प्रयत्न सत्तारूढ गटाने केला आहे. तर राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दबावामुळे अरुंधती संजय घाटगे यांचा पत्ता  कट झाला आहे.
सत्तारूढ गटाने उमेदवार जाहीर केल्यानंतर सतेज पाटील यांनी गोकुळची निवडणूक ताकदीने लढवण्याचा निर्धार पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. सतेज पाटील, विनय कोरे, संजय मंडलिक यांनी एकत्रितरीत्या सत्तारूढ गटाला आव्हान देण्याचे ठरवले आहे. नाराज झालेल्या संचालकांना व इच्छुकांना आपल्याकडे वळवून त्यांची मोट बांधली जाणार आहे. त्यासाठी या तिघांनी सायंकाळी माजी आमदार संजय घाटगे यांची भेट घेतली.

Story img Loader