नरभक्षकाबद्दल संभ्रम : वाघ की बिबटय़ा?
गोंदिया-भंडारा वन परिक्षेत्रातील सीमेवर चार महिलांचा बिबटय़ा आणि वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर परिस्थिती प्रचंड चिघळली असून गावकऱ्यांनी आता वाघाचा मृतदेह दाखविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देऊन आंदोलन सुरू केले आहे. पहिल्या तीन महिलांचा मृत्यू बिबटय़ाच्या हल्ल्यात झाला असून चवथीवर वाघाने हल्ला केल्याचे तसेच हा वाघ आईपासून नुकताच वेगळा झालेला आणि अंदाजे दीड-दोन वर्षांचा असावा, असे घटनास्थळावरील पुराव्यांवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान गावक ऱ्यांचा जमाव दररोज वन विभागाकडे धाव घेण्याचे प्रसंग आल्याने संतापाच्या भरात एखादा अनुचित प्रसंग घडण्याची शक्यता आहे.
वाघ आणि बिबटय़ा अशा दोन हिंस्र प्राण्यांच्या दहशतीत दोन्ही प्राण्यांना गोळ्या घालायच्या का हा यक्षप्रश्न वन विभागापुढे निर्माण झाला आहे. मुख्य वन्यजीव संरक्षक एस.डब्लू.एच नकवी यांनी नरभक्षकाला गोळ्या घालण्याचे आदेश जारी केल्यापासून शंभर जणांची चमू गेल्या ९६ तासांपासून प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतानाही वनविभाग आणि पोलिसांच्या संयुक्त ‘ऑपरेशन टायगर किलिंग’ला अद्याप यश आलेले नाही.

Story img Loader