|| प्रशांत देशमुख
नागपूरमधील कारंजा-मोर्शी केंद्रावर देशात सर्वाधिक भाव
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या एकजुटीने आणि हमीभावाचा मुद्दा ऐरणीवर आणल्याने कारंजा-मोर्शी संत्री सुविधा केंद्रातील संत्री यंदा देशात सर्वाधिक भावाने विकली जात आहेत.
कारंजा येथील निर्यात सुविधा केंद्रात संत्री आणणाऱ्या शेतकऱ्याला सध्या देशात सर्वाधिक भाव मिळत आहे. येथील प्रथमश्रेणीच्या फळांसह इतरही संत्र्यांना ३६ हजार रुपये टन असा भाव कंपनीने दिला आहे. नागपूर मंडीत २५ हजार रुपये, मोर्शीत ३० हजार रुपये, मध्य प्रदेशात २० हजार रुपये तर पंजाबच्या संत्र्याला १५ ते २० हजार रुपये टन, असा बाजारभाव आहे. महाऑरेंज व संत्री उत्पादक संघाने बाजारपेठेवर स्वत:चे प्रभुत्व सिद्ध करीत हमीभावाचा मुद्दा ऐरणीवर आणला. बाग पाहून ठोकप्रमाणे विकत घेणाऱ्या व्यापाऱ्याच्या जाळय़ात अडकणाऱ्या शेतकऱ्यांना हमीभावाने संत्री विकण्याची संधी गेल्या तीन वर्षांपासून मिळायला लागली. संत्री उत्पादक संघटनेचे नेते श्रीधर ठाकरे यांनी हा बदल घडवून आणला. त्यांनी महाऑरेंजच्या माध्यमातून दिल्लीस्थित ‘ऑल फ्रेश’ या फळ निर्यातदार कंपनीशी संपर्क साधला. कंपनीने कारंजा केंद्रात आपले प्रतिनिधी पाठवून संत्र्यांची पारख केली. गरजेनुसार शेतकऱ्यांकडून माल घेणे सुरू केले. परिणामी, हुंडय़ाप्रमाणे बोली लावून किंवा दलालामार्फ त लिलावाद्वारे संत्री विकण्याची आपत्ती टळली. शेतकऱ्यांच्या पसंतीने भाव मिळणे सुरू झाले.
बदल काय?
नागपुरी संत्री देशभरातच लोकप्रिय आहेत. चढय़ा भावाने ती ग्राहकांना विकली जातात. पण शेतकऱ्यांच्या पदरी मात्र अत्यल्प किंमत पडत होती. त्या पाश्र्वभूमीवर खरेदी-विक्रीचे निकषच बदलण्यात आले. सध्या ३६ ते ३० हजार रुपये प्रति टन असा भाव प्रतवारीनुसार मिळत आहे. सध्या कंपनी थेट शेतकऱ्यांकडून संत्री खरेदी करीत असल्याने दलालीचा भरुदड नाही. नागपूर मंडीत संत्र्याचा लिलाव होतो किंवा अडते माल विकून देतात. शेतकऱ्यांना संत्र्याचा खरा भावच माहीत होत नाही. कारंजा व मोर्शी येथे ‘कोटिंग व ग्रेडिंग’ची यंत्रे आल्याने फ रक पडला. संत्र्याचा टिकाऊपणा वाढला. चांगल्या संत्र्याला चांगला दर मागता आला. दिल्लीस्थित कंपनीदेखील नागपुरी संत्र्याला प्रथम पसंती देत असल्याने चित्र बदलले. बाग पाहून भाव ठरवणारा व्यापारी आता शेतकरी सांगेल त्या भावाने विकत घेत आहे. हमीभावाने प्रथमच संत्री विकली जात आहेत.
आज संत्र्याला सर्वाधिक भाव कारंजा केंद्रातून मिळत आहे. आम्ही देशभरातील बाजारपेठा तपासून आमचा भाव निश्चित करतो. त्याच दराने विकतो. तसेच शेतकऱ्यांमध्येही संत्रा उत्पादन व दर्जा सुधारण्याची ऊर्मी तयार होते. त्यांची भाव करण्याची क्षमता वाढली. हीच संत्री देशभरात ४० ते ५५ हजार रुपये टनाने कंपनीतर्फे ग्राहकांना विकली जातात. शेतकरी व कंपनी दोघेही फोयद्यात आहे. रोजची बाजारपेठ तपासून भाव ठरवला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संरक्षण लाभले. – श्रीधर ठाकरे, संत्री उत्पादक संघटनेचे नेते