राष्ट्रीय फलोत्पादन अभियानात संत्री उत्पादन वाढीसाठी विविध योजना राबवून देखील राज्यातील संत्री उत्पादन घटत चालले असून उत्पादकतेच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात तळाशी आले आहे. गेल्या हंगामात देशाची संत्री उत्पादकता ही १० मेट्रिक टन प्रतिहेक्टर एवढी पोहचलेली असताना राज्यात प्रतिहेक्टरी केवळ ३.९ मेट्रिक टन एवढेच उत्पादन हाती आले आहे.
देशात संत्रीबागांचे सर्वाधिक क्षेत्र महाराष्ट्रात आहे, नागपुरी संत्री या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या संत्र्यांची देशांतर्गत मागणी वाढली आहे, पण उत्पादनक्षम संत्री बागांचे क्षेत्र घटत चालले आहे. राज्यात अमरावती, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यात सर्वाधिक संत्री बागा आहेत.
‘नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड’च्या ताज्या अहवालानुसार देशात संत्र्यांचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य म्हणून पंजाबने प्रथम क्रमांक पटकावला आहे. पंजाब राज्याने २८ टक्के उत्पादन घेतले आहे, तर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. गेली अनेक वष्रे महाराष्ट्राचे अव्वल स्थान होते. विशेष म्हणजे केवळ ४२ हजार हेक्टर क्षेत्रातील संत्री बागांच्या भरवशावर पंजाबमध्ये संत्री बागायतदारांनी सुमारे ८ लाख ७२ हजार मेट्रिक टन उत्पादन मिळवले आहे. महाराष्ट्रात संत्री बागांचे क्षेत्र १ लाख २८ हेक्टर असताना देखील केवळ ५ लाख मेट्रिक टन संत्री उत्पादन झाले आहे. मध्यप्रदेशने देखील ३८ हजार हेक्टरमध्ये ६ लाख ८४ हजार मेट्रिक टन उत्पादनाचा आकडा गाठला.
२०१०-११ या हंगामात देशात ३२ लाख ५५ हजार मेट्रिक टन संत्र्याचे उत्पादन झाले, उत्पादकतेच्या बाबतीत पंजाबने पहिले स्थान मिळवले. या राज्यात संत्री बागांमधून २१.२ मेट्रिक टन प्रतिहेक्टर उत्पादन मिळाले. मध्यप्रदेशने प्रतिहेक्टरी १८ मेट्रिक टन उत्पादन घेतले, महाराष्ट्रात मात्र ही उत्पादकता केवळ ३.९ इतकी होती. मेघालय, मणीपूर, त्रिपुरा या सारख्या छोटय़ा राज्यांमध्ये उत्पादकता ६ ते ८ मेट्रिक टन एवढे उत्पादन घेतले जात असताना राज्यातील विशेषत: विदर्भातील संत्री बागांची अत्यंत कमी उत्पादकता ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी पाहता राज्यातील संत्री उत्पादनातला खालावता आलेख स्पष्टपणे नजरेत भरणारा आहे. उत्पादकता ही ६ मेट्रिक टनच्या वर पोहचू शकलेली नाही. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानात दहा वर्षांत संत्री उत्पादन दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते, ते साध्य होऊ शकलेच नाही, उलट संत्री उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र माघारला गेला आहे. या अभियानात आदर्श रोपवाटिका तयार करणे, रोजगार हमी योजनेशी निगडित फळबाग क्षेत्रविस्तार, जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन व उत्पादकता वाढवणे, असे उपक्रम राबवण्यात आले खरे पण, ते आता कागदोपत्रीच शिल्लक असल्याचे दिसून आले आहे. विदर्भातील संत्री बागांना भेडसावणारा मोठा प्रश्न हा सिंचनाचा आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेल्याने संत्री बागांच्या पट्टयात शेतकऱ्यांनी नाईलाजाने बागा नष्ट करण्यास सुरूवात केली आहे. दुसरीकडे रोगांच्या आक्रमणानंतर वेळीच उपाययोजना न झाल्याने लक्षावधी झाडे तशीच नष्ट झाली आहेत. जुन्या बागांचे पुनरूज्जीवन करण्यात अनेक अडथळे आले आहेत. एकीकडे संत्र्यांवर प्रक्रिया करण्यासाठी कोणतीही व्यवस्था निर्माण झालेली नाही. संत्री निर्यात क्षेत्र आता नावापुरते उरले आहे. सुविधांअभावी संत्री बागांच्या अस्तित्वावरच संकट निर्माण झाले आहे. 

Story img Loader