कारंजा येथील संत्रा उत्पादकांचा दिल्लीच्या बाजारपेठेत प्रवेश
ए खाद्या प्रदेशातील खास वैशिष्टय़ राखून असणाऱ्या फ ळाला सुगीचे दिवस आणायचे असेल, तर राजकारणापेक्षा सामूहिक हिताचे लोककारण किती फोयदेशीर ठरू शकते, याचे उत्तम उदाहरण सर्वत्र प्रसिद्ध कारंजा येथील संत्री उत्पादकांनी दाखवून दिले आहे. गतवर्षी पाच हजार रुपये टन भाव मिळालेल्या संत्र्यांना यंदा २५ ते ३० हजार रुपये भाव मिळाला. संत्री उत्पादक एकत्र आले. सामूहिक नेतृत्वातून निर्णय झाला. कारंजाची संत्री थेट दिल्लीच्या बाजारपेठेत पोहोचली. या लोककारणातून यंदाचा ‘आंबिया’ सुबत्तेसह बहरला.
पिढय़ान्पिढय़ांपासून संत्री उत्पादन घेणाऱ्या अमरावती, वर्धा व नागपूर जिल्ह्य़ांतील उत्पादकांची वाटचाल कोरडवाहू कापूस उत्पादकांप्रमाणेच विपन्नावस्थेत चालत असल्याचे चित्र होते. स्थानिक पातळीवर बाजारपेठेचा अभाव व व्यापाऱ्यांकडून होणारी लूट, हे तर पाचवीलाच पूजले होते. शिवाय, गारपीट, किडी, वादळाची नैसर्गिक आपत्ती होतीच, परंतु केंद्राच्या सहकार्याने कारंजा येथे संत्री निर्यात प्रकल्प स्थापन झाल्यानंतर पहाट उगविण्याची चिन्हे दिसू लागली. गत पाच वर्षांत नैसर्गिक आपत्ती आल्या. गतवर्षी कहर झाला. मंडईतील संत्री महामार्गाच्या कडेला पडून राहिली. पाच हजार रुपये टन असा नीचांक गाठला गेला. दक्षिणेतील वादळाने निर्यातींवरही अंकुश आला. नेस्तनाबूत करणाऱ्या या शेतकऱ्यांना यंदा मात्र निसर्गानेही हात दिला.
संत्र्यांचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन झाले, पण भाव न मिळाल्यास पुन्हा आपत्ती होती. संत्री उत्पादकांचे नेते श्रीधर ठाकरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करून पारंपरिक विक्रीपद्धत बाजूला ठेवण्याचा निर्धार केला. या पद्धतीत शेतातील संत्री बाजारपेठेत जाईपर्यंत चौघांच्या हातातून विकली जातात. पहिल्या टप्प्यात पानटपरीवरच बोली लागते. हा पहिला मध्यस्थ हजार रुपयांवर संत्राबाग राखून ठेवतो. मंडईवाला व्यापारी मग १० हजार रुपयांवर बोली लावतो. शेवटी ठोक दलाल बागेचा अंतिम निकाल लावतो. प्रत्यक्षात संत्री उत्पादकास हजार रुपयांचा भाव टनामागे मिळतो. मात्र, या वेळी एक हजार रुपयांऐवजी ३५ हजार रुपये भाव पदरात पडला. ही भरीव वाढ संत्री उत्पादक संघटनेने दिल्लीतील संत्री विक्रेत्या कंपनीला पाचारण केल्याने शक्य झाली.
दिल्लीच्या ऑलफ्रेश कंपनीने थेट कारंजा येथील विक्री केंद्रात बोलणी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २ ऑक्टोबरला विक्रीचा शुभारंभ झाला. उत्पादकांनी संत्राप्रेमी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून समन्वय ठेवला. कंपनीचे चार-पाच सुपरवायझर बागा पाहायचे. संत्र्याचा दर्जा ओळखायचे. त्यांचेच मजूर संत्रातोड करीत. दर्जानुसार पहिल्या टप्प्यात ४५ हजार रुपये टन भाव मिळाला. हा विक्रमच होता. त्यानंतर किमान २५ हजार रुपये टनापर्यंत प्रत्येकाला भाव मिळाला. पूर्वी दलाल मोजणी करताना पारंपरिक पद्धतीने हजारावर बाराशे संत्री उचलत. कंपनीने मात्र तसे केले नाही. मोर्शी, काटोल, अंजनगाव येथून आलेल्या संत्री उत्पादकांची झोळी भरभरून भरली. कंपनीला हा भाव येथे ग्रेिडग व कोटिंगची सोय मिळाल्याने परवडला. १४०० टन संत्री खपली. मात्र यानंतर नोटाबंदीचा आघात झाला. अचलपूर-वरूड भागात व्यापाऱ्यांनी जुन्या नोटा देत संत्री घेतली. बऱ्याच शेतकऱ्यांनी जुन्या नोटा नाकारल्याने त्यांचा माल पडून राहला. कारंज्याला मात्र कंपनीने थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची पद्धत स्वीकारली होती.
हे वर्ष सुगीचे ठरले – श्रीधर ठाकरे
संत्री उत्पादक संघटनेचे श्रीधर ठाकरे म्हणाले की, आता संत्र्याचे भाव पडले आहेत, पण त्यामुळे मोठी हानी नाही. कारण, बागेत आता केवळ दहा टक्केच संत्री शिल्लक आहेत. आम्ही संत्री टिकण्यासाठी आवश्यक व्हॅक्स कोंटिग व प्रतवारी कारंजातच करून दिली. त्याचेही पैसे कंपनीनेच दिले. आता ही थेट विक्रीची पद्धत विदर्भपातळीवर वाढविण्याचा विचार आहे. हे वर्ष संत्री उत्पादकांसाठी सुगीचे ठरले, हे निश्चित.
लोककारणाचा मंत्र इतरांनीही गिरवावा -सहकारमंत्री
- नोटाबंदीचा फ टका आता दुसऱ्या टप्प्यात बसत आहे. संत्री ग्राहकांचे प्रमाण ५० टक्क्यांवर घसरले आहे. त्यामुळे उठाव नाही, परंतु त्याचे प्रमाण मोठे नाही. नोटाबंदीपूर्वीच कंपनीशी सौदे केल्याने ८० टक्के शेतकऱ्यांना लाभच झाला.
- थेट खात्यात पैसे आल्याने तुडुंब भरलेली बँकखाती शेतकऱ्यांसाठी बचतच ठरली. संत्री उत्पादकांनी लोककारणाचा जपलेला मंत्र इतरांनीही गिरवावा, असा सल्ला या केंद्राला आवर्जून भेटीस आलेले सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिला आहे.