सोलापूरमध्ये करोना काळात हातातलं काम जाऊन आर्थिक विवंचना आल्यानं वैतागून एका ऑर्केस्ट्राबारमधील वादक कलावंताने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शहरातील बाळे येथे सायंकाळी हा प्रकार घडला. हेमंत सुधाकर भतांबरे (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या वादक कलावंताचे नाव आहे. भतांबरे हे एका ऑर्केस्ट्राबारमध्ये पियानो वादन करून स्वतःचा संसार चालवत. परंतु करोनामुळे गेल्या दीड-पावणेदोन वर्षात कठोर निर्बंधामुळे ऑर्केस्ट्राबार बंद आहे. त्यामुळे त्यांना या काळात कोणतंही काम मिळालं नाही.
पीडित हेमंत भतांबरे यांनी बँकेतून कर्ज काढून बाळे वर्धमान रेसिडेन्सी संकुलात घर खरेदी केलं होतं. मात्र, करोना काळात काम बंद झाल्यामुळे त्यांना संसाराचा गाडा हाकणे आणि बँक कर्जाचे हप्ते फेडणे अशक्य झाले. या आर्थिक अडचणीतून भतांबरे मानसिकदृष्ट्या खचले आणि त्यांनी आत्महत्येचा टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं.
हेही वाचा : धक्कादायक, २०२० मध्ये शेतकऱ्यांपेक्षाही अधिक व्यावसायिकांच्या आत्महत्या, आकडेवारीतून उघड
हेमंत भतांबरे हे दुपारी घरात एकटे झोपले होते. बराच वेळ होऊनही पती न उठल्यानं त्यांच्या पत्नीने दरवाजा ठोठावला, मात्र काहीही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर दरवाजा तोडून काढण्यात आला. यावेळी हेमंत भतांबरे साडीने छतावरील विद्युत पंख्याला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.