बोथे (ता.माण) येथील दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषी कंपनी आणि व्यक्तीची कोणतीही हयगय केली जाणार नाही. तसेच दुर्घटनेत मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये मदत देण्यात येईल अशी घोषणा पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केली.
बोथे येथे झालेल्या स्फोटात तीन जण ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. पालकमंत्र्यांनी घटनास्थळाला भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
शिवतारे म्हणाले, बोथे विंडमिल फार्म कंपनीच्या पवनचक्क्या उभारणीच्या कामास कमल एन्टरप्रायजेस ही कंपनी काम करत होती. या कंपनीने सुरक्षारक्षकांसाठी बांधलेल्या शेडमध्ये जिलेटीनचा साठा केला होता, त्याचा स्फोट झाला. या कंपनीला जिलेटीनचा साठा करण्याचा परवाना होता का? योग्य ती खबरदारी त्यांनी घेतली होती का? आदीच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असून, एक्स्प्लोझिव्ह अ‍ॅक्टनुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, तसेच सदोष मनुष्यवधाच्या कलमानुसारही गुन्हे दाखल केले जातील असेही शिवतारे म्हणाले. दोषी कोण कंपनी की उपकंपनी, कोणाचीही गय केली जाणार नाही.
ते म्हणाले, जिल्हय़ातील सर्व पवनचक्क्यांच्या जबाबदार व्यवस्थापक, अधिकाऱ्यांची बठक घेऊन शेतकऱ्यांच्या तक्रारी, पवनचक्की उभारण्यासाठी केलेले अवैध उत्खनन आदींबाबत चौकशीचे आदेश प्रशासनाला दिले.
शिवतारे म्हणाले, मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना तातडीची मदत म्हणून एक लाख रुपयांची मदत दिली जात आहे, मात्र मुख्यमंत्र्यांशी बोलून ही मदत दोन लाख करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या वेळी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख तसेच आ. जयकुमार गोरे उपस्थित होते. या वेळी बोथे ग्रामस्थांनी मागण्यांचे निवेदन दिले.