काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो’ यात्रेला प्रारंभ झाला आहे. एकूण १२ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशातून ही यात्रा जाणार आहे. तर महाराष्ट्रात ७ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथून या यात्रेचे आगामन होणार आहे. या यात्रेवर देशभरातील राजकीय पक्षांचे लक्ष आहे. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या मोठय़ा सभा घेण्याचे प्रदेश काँग्रेसचे नियोजन आहे. याशिवाय ही भारत जोडो यात्रा यशस्वी करण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांची तयारीही सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी महाविकास आघाडीमधील आपले प्रमुख मित्र पक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला देखील या यात्रेत सहभाग नोंदवण्यासाठी निमंत्रण दिले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भारत जोडो यात्रेचे निमंत्रण स्वीकारले आहे. यावरून भाजपाने ट्वीटद्वारे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा : राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात चार जिल्ह्यातच गुंडाळली जाणार – भाजपा
“काँग्रेसकडून उद्धव ठाकरेंना ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होण्याचे आदेश!.” , असं भाजपाकडून ट्वीट करण्यात आलं आहे. या ट्वीट सोबत भाजपाने व्यंगचित्र जोडलं असून, त्यात उद्धव ठाकरे हे सोनिया गांधी आणि शरद पवारांसमोर झुकून मुजरा करताना दिसत आहेत. याशिवाय त्यांच्या बाजूला आदित्य ठाकरे दाखवण्यात आले असून, “बाबा इथलं झालेलं असेल तर तिकडे मुजरा घालायला चला.” असे ते म्हणताना दर्शवलं आहे. त्यांच्या पाठीमागे काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे आगमन दाखवण्यात आले आहे.
या अगोदरही भाजपाने ट्वीटद्वारे भारत जोडो यात्रेबद्दल टिप्पणी केली होती. “राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात ४ जिल्ह्यातच गुंडाळली जाणार! केरळ सारख्या लहानश्या राज्यात तब्बल २० दिवस थांबून राज्यभर दौरा करणाऱ्या राहुल गांधींनी महाराष्ट्रात मात्र ‘भारत जोडो’ यात्रा फक्त ४ जिल्ह्यातून करायचं ठरवलं आहे.”
याशिवाय “राहुल गांधीना खात्री झाली आहे की, महाराष्ट्रात त्यांच्या भारत जोडो यात्रेला प्रतिसाद मिळणार नाही. त्यामुळे ३६ पैकी फक्त ४ जिल्ह्यात ते ‘भारत जोडो’ यात्रा करणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल कायम गरळ ओकणाऱ्या राहुल गांधीना महाराष्ट्रातील जनता नक्कीच अद्दल घडवेल.” असंही भाजपाने म्हटलं होतं.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि मुंबई विभागीय काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते अमरनाथ राजूरकर यांनी एका शिष्टमंडळासह मातोश्रीवर उद्धव ठाकरे तर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवार यांची भेट घेतली होती.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार असून, आपणही या यात्रेत सहभागी व्हावे, असे निमंत्रण काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उभय नेत्यांना दिले. दोहोंनीही हे निमंत्रण स्वीकारले असून, शरद पवार स्वतः तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यात्रेत सहभागी होणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगण्यात आले.