कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वेळेत शासकीय मदत मिळावी यासाठी तातडीने पंचनामे पूर्ण करा, असे आदेश संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
तालुक्यातील शिरसगाव व परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची त्यांनी पाहणी केली. तालुक्यातील शिरसगावसह गोंधवणी, हरेगाव, मुठेवाडगाव, माळवाडगाव, खानापूर आदी भागांचा कृषिमंत्री विखे यांनी दौरा केला. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, जी. के. पाटील, बाबासाहेब दिघे, भाऊसाहेब पवार होते. शिरगाव येथे त्यांनी कृषी व महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. नुकसानग्रस्त सर्व पिकांचे वेळेत पंचनामे सादर करा. शासन स्तरावर जास्तीतजास्त मदत मिळण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
कृषी अधिकारी झेड. एच. पटेल व कामगार तलाठी जनार्दन ओहोळ यांनी भागातील नुकसानीची माहिती दिली. शिरसगाव परिसरातील ५५५ शेतकऱ्यांचे ५४२ हेक्टर क्षेत्रावरील पिके उद्ध्वस्त झाली तर ब्राह्मणगाव १९६ शेतकऱ्यांचे १७६ हेक्टर पिकांचे पंचनामे पूर्ण झाले. त्यात गहू, हरभरा, ऊस, चारापिके, फळबागा, भाजीपाला आदी पिकांचा समावेश असल्याचे त्यांनी कृषिमंत्री विखे यांना सांगितले.
महसूल व पोलीस पथकाला वाळूतस्करांची धक्काबुक्की
वार्ताहर, पारनेर
वाळूतस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून वाहने पळवून नेली. तालुक्यातील देसवडे तसेच मांडवे परिसरात ही घटना घडली. तहसीलदार डॉ. विनोद भाबरे यांनी एक ट्रॅक्टर, एक दुचाकी पोलिसांच्या ताब्यात दिली. दरम्यान, वाळूउत्खनन करणा-या जेसीबी मशीनवरील कारवाईत पूर्वी महसूल विभागात काम करणा-या अधिका-याने हस्तक्षेप केल्याची मांडवे परिसरात चर्चा असून हे मशीन घटनास्थळी सापडले नसले तरी त्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार भांबरे यांनी सांगितले.
तहसीलदार डॉ. भांबरे हे मुळा नदीपात्रात वाळूतस्करांवर कारवाईसाठी गेले असता देसवडे येथे संगमनेर तालुक्यातील एका ट्रॅक्टरचालकाने धक्काबुक्की करून ट्रॅक्टर पळवून नेला. ट्रॅक्टर पळवून नेण्यासाठी मदत करणा-याची दुचाकी मात्र भांबरे व पोलिसांनी ताब्यात घेतली. मांडवे येथे चोरीची वाहतूक करणा-या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात येऊन तो ताब्यात घेण्यात आला.
मांडओहळ नदीमध्ये वाळूउपसा करणारे जेसीबी मशीन तहसीलदार आल्याचा सुगावा लागताच पळवून नेण्यात आले. महसूल तसेच पोलिसांच्या पथकाने त्याचा पाठलाग करेपर्यंत हे मशीन मालकाच्या घरापुढे लावण्यात आले होते. तेथे हे पथक गेल्यानंतर मशीन मालकाने नदीमध्ये मशीन सापडले नसल्याचे कारण पुढे करून हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. या वाळूतस्कराने पूर्वी नगर जिल्हय़ात, महसूल विभागात कार्यरत असलेल्या व लाचेच्या सापळय़ात सापडल्यानंतर आता मुंबई येथे असलेल्या अधिका-यालाही फोन लावला. या अधिका-यानेही घरापुढील मशीनवर कशी कारवाई करता, असे म्हणत तहसीलदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
आदिवासी लोकांशी भांडणे झाल्याने मांडओहळ नदपात्रात वाळूचोरी सुरू असल्याचे तहसीलदारांना ते पोलिसांसह तेथे गेले असता तोपर्यंत मशीन तेथून हलविण्यात हा तस्कर यशस्वी झाला. हे मशीन रंगेहाथ पकडले नसले तरी त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.