प्राध्यापकांनी विद्यापीठ आयोगाच्या नियमावलीवर बोट ठेवून दररोज साडेसहा तास महाविद्यालयात थांबण्यास नकार देताच शिक्षण सहसंचालकांनी काढलेले आदेश मागे घेतले आहेत. तथापि, शिक्षण सहसंचालकांनी विद्यापीठाच्या अधिकारात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त झालेल्या सुटा संघटनेने ९ फेबुवारीस मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षण सहसंचालकांनी वरिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांना एका आदेशान्वये महाविद्यालयात आठवडय़ात ४० तास देण्यास सांगितले होते. या ४० तासाचे कसे नियोजन करण्यात आले हे कार्यालयाच्या निदर्शनास येण्यासाठी वेळापत्रक पाठविण्यास सांगण्यात आले होते.
सध्या बहुतांश महाविद्यालयाचे दररोज पाच तासाचे वेळापत्रक अमलात असून अतिरिक्त वेळाचे काय करायचे हा प्रश्न होता. त्याचे नियोजन वेळापत्रकात कसे करायचे याचा विचार महाविद्यालय स्तरावर सुरू असतानाच ‘सुटा’ या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत कार्यरत असणाऱ्या प्राध्यापक संघटनेने या निर्णयाला कडाडून विरोध केला. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परिपत्रकाचा आधार घेत प्राध्यापकांना देण्यात आलेल्या कामाच्या तासाचे नियोजन होत असल्याचे शिक्षण सहसंचालकांच्या लक्षात आणून देण्यात आले.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परिपत्रकानुसार आठवडय़ातून ३० तास महाविद्यालयातील कामकाजासाठी आणि उर्वरित १० तास प्रवेशप्रक्रिया, खेळ, पूर्व परीक्षा तयारी यासाठी केलेल्या कामाचे धरण्यात येणार आहेत. यामुळे आठवडय़ात ४० तास देण्याचा आदेश शिक्षण सहसंचालकांनी मागे घेतला असून पूर्वीप्रमाणेच कामाचे तास राहतील असे पत्र वरिष्ठ महाविद्यालयांना धाडले आहे.
तथापि, शिक्षण सहसंचालकांना वरिष्ठ महाविद्यालयाचे कामाचे नियोजन करण्याचा अथवा आदेश देण्याचा अधिकारच नसल्याचे सांगत हा विद्यापीठाच्या कार्यकक्षेत हस्तक्षेप असल्याचे सांगत सुटाने आंदोलन हाती घेतले आहे. दि. ९ फेबुवारीस शिक्षण सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सुटाच्या प्रतिनिधींनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा