जि. प.चे शिक्षण सभापती बजरंग सोनवणे यांनी केज तालुक्यातील शाळांना अचानक भेट दिली असता ५ शाळांमध्ये विदारक स्थिती समोर आली. बहुतांश शाळांमध्ये शिक्षक दांडीयात्रेवर होते, तर एका शाळेत बनावट विद्यार्थीसंख्या दाखवून शिक्षकांनी आपली पदे वाचविण्याचा सपाटा लावल्याचे आढळून आले. गरहजर व अनावश्यक शिक्षकांवर तत्काळ कारवाई करा, असे आदेश सभापतींनी प्रशासनाला बजावले आहेत.
सभापती सोनवणे व केजचे गटशिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय मेंढेकर यांनी तालुक्यातील ५ शाळांना अचानक भेटी देऊन तपासणी केली. या वेळी बहुतांश शाळांवरील शिक्षक शाळेच्या वेळेत कोणतीही पूर्वसूचना न देता दांडीयात्रेवर असल्याचे दिसून आले. एका ठिकाणी बनावट विद्यार्थीसंख्या दाखवून शिक्षकांनी आपली पदे वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. शिक्षकांना गणवेशाची सक्ती असताना त्याची अंमलबजावणी होत नसल्याचेही दिसून आले. यात डोणगाव येथील व घुलेवस्तीवरील शाळेत दोन शिक्षक हजर होते. विद्यार्थ्यांची पटसंख्या १८ होती. कोणाकडेही ड्रेसकोड व आयकार्ड नव्हते. तसेच शिक्षण समितीसह जिल्हास्तरीय समितीचा फलक नव्हता. शिरपुरा येथील शाळेतही ३ शिक्षकांपकी एकच शिक्षक हजर होता. विद्यार्थ्यांजवळ ओळखपत्र नव्हते. शिक्षकांच्या टाचण वह्या, प्रवेश निर्गम रजिस्टर अपूर्ण असल्याचे आढळून आले. पहिल्याच विद्यार्थ्यांचे हजेरीपटही कोरे आढळून आले. याचा पंचनामा करून दोषी शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश सभापतींनी प्रशासनाला बजावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा