शेतकऱ्यांच्या जमिनीत स्पेंट वॉश हे रसायन टाकून प्रदूषण करणाऱ्या रॅडिको एनव्ही कंपनीने त्यांची उत्पादने बंद करावीत, असे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबालंगन यांनी गुरुवारी बजावले. शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व तहसीलदारांनी केलेले पंचनामे या आधारे प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. कंपनी बंद करताना कोणताही धोका होणार नाही, याची काळजी घेत नवीन उत्पादनासाठी लागणारे मोलॅसिस हा कच्चा माल भरला जाऊ नये आणि त्यानंतर या कंपनीची वीज खंडित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
शेंद्रा परिसरातील रॅडिको एनव्ही या कंपनीने गट क्र. ३, ४, ५ ६ मधील शेतकऱ्यांच्या शेतात विषारी रसायने सोडली होती. त्यामुळे शेतीचे पूर्ण नुकसान झाले होते. या बाबत शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर तहसीलदारांनी त्याचा पंचनामा केला होता. मात्र, कंपनीला नोटीस देण्याबाबत महसूल विभाग टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आले होते. औरंगाबादच्या तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर ५ जूनला त्यांनी पंचनामा केला. मात्र, १८ दिवस कंपनीला साधी नोटीसही दिली नव्हती. मात्र, केलेल्या कारवाईचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आला.
दरम्यान, मंडळाच्या अधिकाऱ्यांनीही पंचनामे केले होते. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार धोकादायक रसायन पसरून अपाय होईल, अशी स्थिती निर्माण केल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कलम २६ अन्वये व २१ कलमाचा भंग झाल्याने ३३(ए) या कायद्यान्वये कंपनी बंद करण्याचे आदेश आज बजावण्यात आले. या अनुषंगाने घेण्यात आलेल्या सुनावणीत तक्रारदारांनी रासायनिक विषारी द्रव्ये व रंगीत पाणी सोडल्याचा जबाब नोंदवला. केलेल्या चौकशीतही नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आल्याने रॅडिको एनव्ही बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा