अहिल्यानगरःशालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस व इतर वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत व त्याचे ‘डिस्प्ले’ शाळांमध्ये, मुख्याध्यापक कक्षात असावेत असा आदेश जिल्हा शालेय व सुरक्षितता व जिल्हा प्रवासी समन्वय समितीच्या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश बोला यांनी दिले आहेत.

याशिवाय १४ वर्षाखालील शालेय मुलांची ने-आण करणाऱ्या बस, वाहनांमध्ये महिला कर्मचारी नियुक्त कराव्यात, बस व वाहन चालक, वाहक व सहाय्यकांची पोलीस विभागाकडून चारित्र्य पडताळणी करून घ्यावी. शालेय बस व वाहनांवर अत्यावश्यक दूरध्वनी क्रमांक लावावेत असेही आदेश देण्यात आला आहेत.

जिल्हा शालेय बस सुरक्षितता व जिल्हा प्रवासी समन्वय समितीची बैठक जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी हे आदेश देण्यात आले. हे आदेश शिक्षण विभागामार्फतही स्वतंत्रपणे शाळांना दिले जाणार आहेत. सर्व शाळांनी परिवहन समितीच्या बैठका नियमित घेण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

महापालिकेचे उपायुक्त विजय मुंडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील पंडित आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात परिवहन विभागाचे अहिल्यानगर व श्रीरामपूर असे दोन विभाग आहेत. त्यातील अहिल्यानगर विभागातच शालेय वाहतूक करणाऱ्या ८३० बस आहेत. सर्व एसटी बसस्थानकाच्या परिसरात स्वच्छता ठेवण्याबरोबरच रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाश व्यवस्था राहील याकडे लक्ष द्यावे, बसस्थानक परिसरात बेशिस्त वर्तणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पहारेकऱ्यांची संख्या अधिक वाढवावी, बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही ओला यांनी यावेळी दिल्या.

Story img Loader