मराठवाडय़ातील आंदोलनास यश

औरंगाबाद : मराठवाडय़ातील आमदार जायकवाडीच्या पाणीप्रश्नी आक्रमक होत असल्याचे चित्र निर्माण झाल्यानंतर मंगळवारी नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणातून ८.९९ अब्ज घनफूट पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी दिले. जायकवाडी धरणामधील १७२ द.ल.घ.मी. तूट लक्षात घेऊन पाणी सोडण्यासंदर्भात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्देशानंतर पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले. सोमवारी मराठवाडय़ातील सर्वपक्षीय आमदारांनी जायकवाडीसह मराठवाडय़ातील सिंचनप्रश्नी आक्रमक होण्याचे ठरविले होते. या पाश्र्वभूमीवर मुंबईमध्येही जलसंपदा विभागात सोमवारी हालचाली सुरू होत्या.

मुळा, गंगापूर, दारणा, पालखेड या चार धरणसमूहातून पाणी सोडताना विद्युत प्रवाह बंद ठेवण्यात येणार असून पाण्याचा व्यय अधिक होऊ नये म्हणून एका वेळी शक्य तेवढा अधिक विसर्ग करण्याच्या सूचना नाशिक व नगर जिल्ह्यातील सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. गोदावरी पाटबंधारे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यास टाळटाळ केल्याचे दिसून येत असल्याने जलसंपदा मंत्र्यासह सरकारचा दबाव असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांनी पुढाकार घेत पाणीप्रश्नी आंदोलन करण्याची तयारी सुरू केली होती. नगर-नाशिकमधील शेतकऱ्यांनी जायकवाडीचा बदललेला पाणीवापर, पाण्याचा दुष्काळ नसणे या अनुषंगाने आक्षेप दाखल केले होते. त्यावर स्वत: निर्णय घेण्याऐवजी कार्यकारी संचालकांनी शासनाकडून मार्गदर्शन मागविले होते.

मात्र, या प्रश्नी जलसंपदा मंत्री वा सरकारचा दबाव नाही हा संदेश देण्यासाठी मार्गदर्शनाची जबाबदारी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे सोपवली गेली. प्राधिकरणाचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांनी महामंडळास स्पष्टीकरणात्मक निर्देश दिल्यानंतर मंगळवारी पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे नगर-नाशिकमधील धरणातून पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोणत्या धरणातून किती पाणी सोडणार

      धरणसमूहाचे नाव पाणी

मुळा    १.९०

प्रवरा   ३.८५

गंगापूर  ०.६०

दारणा   २.०४

पालखेड ०.६०

एकूण   ८.९९

(सर्व आकडे अब्जघनफुटामध्ये)

Story img Loader