रोहा तालुक्यातील कोकबन प्राथमिक शाळेतील पोषण आहाराच्या निकृष्ट धान्यप्रकरणी चौकशीचा अहवाल तातडीने सादर करून मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांवर कारवाई करावी, असे आदेश जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती ज्ञानदेव पवार यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
कोकबन शाळेत पोषण आहारासाठी शासनाकडून पुरविण्यात येणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरण्यात येते. तसेच तांदूळ, डाळी हे सडलेल्या, कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली.
कोकबन ग्रामपंचायतीच्या सरपंच ब. रा. वाघमारे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र वाजंत्री, गाव कमिटीचे अध्यक्ष भालचंद्र वाडकर, उपसरपंच ठाकूर आदींसह ग्रामस्थांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता धान्य कुजलेले असल्याचे त्यांना दिसून आले. ग्रामस्थांनी स्टोअर रूमची पाहणी केली असता त्यात सडलेले धान्य आढळून आले. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ पालकवर्गात संतापाची लाट उसळली असून निकृष्ट दर्जाचे साहित्य तसेच धान्य ठेवण्यात आलेल्या साठवण खोलीला ग्रामस्थांनी सील ठोकले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणारे मुख्याध्यापक गुरव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
याची माहिती मिळताच शिक्षण सभापती ज्ञानदेव पवार यांनी शाळेला भेट देवून वस्तुस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत शिक्षणाधिकारी किसन पवार, गटविकास अधिकारी बी. टी. जायभाये, गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण काप उपस्थित होते. मागील मार्च महिन्यात शाळेला ९० किलो डाळ पोषण आहारासाठी पुरविण्यात आली होती. त्यातील ३० किलो डाळ शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत वापरण्यात आली. उरलेली ६० किलो डाळ तशीच ठेवली. ती कुजून खराब झाली. ही डाळ पोषण आहारासाठी वापरली नसली तरी मुख्याध्यापक दिलीप गुरव यांच्या हलगर्जीपणामुळे वाया गेली आहे. तसेच ही बाब त्यांनी शाळा समितीच्या सदस्यांपासून लपवून ठेवली.
केंद्रप्रमुख मिलिंद कासारे हे वेळोवेळी भेटी देत नसल्याने हा प्रकार घडला आहे. कामात हलगर्जी केल्याप्रकरणी दोघांवरही कारवाई करण्याचे आदेश सभापती ज्ञानदेव पवार यांनी दिले आहेत. यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण काप यांना तातडीने सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Story img Loader