शिर्डीत वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी स्थापन केलेली पोलिसांची वाहतूक शखा निष्कामी ठरत असून संबंधित अधिकारी वाहतूक नियंत्रणाऐवजी अन्य कामातच दंग असतात, त्यामुळे शिर्डीत वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहे. या अधिकाऱ्यांची बदली करून वाहतुकीला शिस्त आणावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष कैलास कोते व उपनगराध्यक्ष राजेंद्र कोते यांच्यासह शिर्डी ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत त्यांनी आंदोलनाचाही इशारा दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले, की शिर्डी हे जागतिक कीर्तीचे देवस्थान असल्याने या ठिकाणी भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे साहजिकच वाहनांची गर्दी असल्याने शिर्डीत वाहतुकीवर त्याचा परिणाम होतो. गर्दीच्या वेळी यात आणखी भर पडते. शिर्डीत होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेता विशेष बाब म्हणून येथे स्वतंत्र वाहतूक शाखा स्थापन करण्यात आली.
सुरुवातीच्या काळात वाहतूक शाखेने चांगली मोहीमही राबवली. मात्र त्यात सातत्य टिकले नाही. त्यामुळेच त्या मोहिमेविषयीच साशंकता व्यक्त होते. स्वतंत्र वाहतूक शाखेमुळे शिर्डीत अवैध प्रवासी वाहतुकीस मोठे प्रोत्साहन मिळाले असून, या वाहनधारकांना कोणतीही शिस्त राहिलेली नाही. रस्त्यावर वाटेल तिथे वाहने उभी केली जाते. खासगी ट्रॅव्हल्सच्या तीन-चार बसेस महामार्गावर आडव्या-तिडव्या उभ्या असतात. वाहतूक शाखेचे पोलीस व अधिकारी काहीएक कारवाई करीत नाही. येत्या १४ मार्चपर्यंत वाहनांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करणार नसाल तर शिर्डी ग्रामस्थ रस्त्यावर येऊन वाहतूक सुरळीत करतील व आहे त्या ठिकाणी वाहनांची हवा सोडून देतील. याची सर्वस्वी जबाबदारी वाहतूक पोलिसांची असेल असा इशारा देण्यात आला आहे.  
या पत्रकावर कैलास कोते, सुधाकर िशदे, मुकुंद कोते, बाबासाहेब कोते, भानुदास गोंदकर, उत्तम कोते, अभय शेळके, युवक काँग्रेसचे अध्यक्ष ताराचंद कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, रतिलाल लोढा आदींच्या सहय़ा आहेत.

Story img Loader