पाणी सोडण्याच्या मागणीने सरकार त्रस्त
पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली जायकवाडी धरणात वारंवार नगर व नाशिक जिल्ह्य़ांतील धरणांमधील पाणी सोडण्याच्या मराठवाडय़ाच्या मागणीला आता राज्य सरकार वैतागले आहे. मृत साठय़ातूनच औरंगाबादचा पाणीप्रश्न सोडवण्याची सूचना करण्यात आली असून, त्यासाठी आणखी निधी दिला जाणार आहे.
जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत नाशिक येथे झालेल्या बैठकीत आमदार भाऊसाहेब कांबळे व आमदार अशोक काळे यांनी जायकवाडीत सोडण्यात आलेल्या पाण्याच्या गैरवापराबद्दल तक्रार केली होती. त्या वेळी तटकरे यांनी, ‘पिण्यासाठी जायकवाडीत वारंवार पाणी सोडण्याची मागणी केली जात असली तरी वस्तुस्थिती तपासूनच यापुढे निर्णय घेतला जाईल, वारंवार पाणी सोडणे योग्य नाही, ही आमदारांची मागणी रास्त आहे. जायकवाडीच्या मृत जलसाठय़ाचा अधिक व योग्य वापर करणे शक्य असून त्याचा अभ्यास सुरू आहे,’ असे स्पष्ट केले होते. जायकवाडीत सोडलेल्या पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर गैरवापर होत आहे. पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली हे पाणी औद्योगिक कारणासाठी वापरले जाते, तसेच शेतीकरिताही पाणी वापरले जाते, त्यामुळे पाणी सोडण्याचा हेतू साध्य होत नाही, असे कांबळे व काळे यांनी निदर्शनास आणून दिले. भंडारदरा धरणात पुरेसा पाणीसाठा झाला आहे. शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली. आता उगवून पडलेली पिके जळून चालली आहेत. धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी करण्यात आली. पण तटकरे यांनी त्यासंदर्भात कोणताही निर्णय दिला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा