लातूर- लातूर शहरातील एका तरुणाच्या आई-वडिलांनी ब्रेन डेड झालेल्या आपल्या मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला व त्यातून सहा जणांच्या आयुष्यात आनंद फुलला. १९ मार्च रोजी दुचाकी अपघातात लातूर शहरातील भावेश संतोष तिवारी वय २० राहणार हमाल गल्ली लातूर या तरुणाचा अपघात झाला होता. ब्रेन डेड झाल्याने त्यांचे अवयव दान गुरुवारी हैदराबाद येथे २७ मार्च रोजी करण्याचा निर्णय त्याच्या आई-वडिलांनी घेतला.
भावेषचे दोन्ही मूत्रपिंड, हृदय, दोन डोळे व लिव्हर याचे दान करण्यात आले त्यातून सहा जणांचे आयुष्य फुलले. रंगपंचमीच्या दिवशी भावेश आपल्या आईसोबत औसा रस्त्यावरील वासनगाव येथील राधास्वामी सत्संग मंडळाच्या सत्संगात सहभागी होण्यासाठी निघाला होता मात्र समोरून येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक बसल्याने भावेश जखमी झाला. त्याची आई अरुणा तिवारी ही जखमी झाली. भावेशला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याच्या मेंदूला मार लागल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली व तीन दिवसानंतर डॉक्टरांनी मुलगा भावेष ब्रेन डेड झाल्याचे सांगितल्यानंतर कुटुंबीय अस्वस्थ झाले.
वडील संतोष तिवारी व आई अरुणा तिवारी यांनी मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला व गुरुवारी हैदराबाद येथे हे अवयव दान करण्यात आले. शुक्रवारी सकाळी हैदराबाद येथून मृतदेह लातूरात दाखल झाला व भावेषच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भावेषच्या कुटुंबियांनी समाजासमोर वेगळा आदर्श घालून दिला आहे.