राज्य शासनाने सेंद्रिय शेती धोरण जाहीर करून सहा महिने उलटून गेली, पण अजूनही सेंद्रिय शेती सुकाणू समिती आणि अंमलबजावणी समिती गठित झाली नसल्याचे चित्र आहे. एकीकडे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याचे धोरण ठरवायचे आणि दुसरीकडे रासायनिक खतांच्या अर्निबधित वापरासाठी मोकळीक द्यायची, या प्रकारामुळे शेतकरीदेखील संभ्रमित आहेत. एका वर्षांत १० टक्के लागवडीखालील क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जानेवारीमध्ये सेंद्रिय शेती धोरण जाहीर करण्यात आले, त्यानंतर सुकाणू समिती आणि अंमलबजावणी समिती गठित करणे अपेक्षित होते, सहा महिन्यांनंतरही समित्या गठित झालेल्या नाहीत. कृषी विद्यापीठांच्या पातळीवर एक-दोन बैठका झाल्या. यापलीकडे प्रगती झालेली नाही. त्यामुळे उद्दिष्ट गाठता येईल की नाही, याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.
राज्यात सेंद्रिय शेतीचे क्षेत्र २ लाख ७७ हजार हेक्टपर्यंत पोहोचले आहे. सुमारे २ लाख १३ हजार शेतकरी या पद्धतीने शेती करतात. गेल्या काही वर्षांत सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असली, तरी इतर राज्यांच्या तुलनेत ही गती कमी आहे. राज्यात २००९ मध्ये दीड लाख हेक्टर क्षेत्र होते. यात आदिवासी भागातील दुर्लक्षित सेंद्रिय शेतीचाही समावेश आहे.
सेंद्रिय शेतीमध्ये असलेले सूक्ष्म जीवशास्त्र, मृदाशास्त्र, जैवविविधता, जैवरसायनशास्त्र यांविषयी बहुतांश शेतकऱ्यांना माहिती नाही. गांडूळ खत, शेण खतापुरती सेंद्रिय शेतीची व्याप्ती शेतकऱ्यांच्या मनात रुजली आहे. कीटकनाशक आणि रासायनिक खतांच्या अनावश्यक वापरामुळे मातीत बहुपोषकांची कमतरता जाणवू लागली आहे. मृदा आरोग्य आणि सुपीकता व्यवस्थापनविषयक राष्ट्रीय प्रकल्पाच्या (एनपीएमएसएचएफ) अहवालात राज्यात मातीतील नायट्रोजन, फॉस्फरस आणि झिंकच्या कमतरतेविषयी उल्लेख आहे. मृदा आरोग्य पत्रकांच्या माध्यमातून मातीपरीक्षणाला प्रोत्साहन दिले जात असले, तरी बहुतांश शेतकरी त्यापासून वंचित आहेत. राज्यात सेंद्रिय शेतीसाठी गाझियाबादच्या राष्ट्रीय केंद्राच्या वतीने सेवा पुरवणाऱ्या गटांची योजना राबवण्यात आली, यात केंद्र आणि राज्य शासनाचाही सहभाग होता. राज्याच्या कृषी खात्याचा कृती आराखडा, राष्ट्रीय फळे व भाजीपाला महामंडळाची सामूहिक शेती गट अशा योजना राबवण्यात आल्या, पण त्या योजना बंद पडल्या. त्याचा पाठपुरावादेखील झाला नाही, असे दिसून आले आहे.
राज्यात दशकभरात रासायनिक खतांचा वापर दुपटीने वाढला आहे. नत्र, स्फुरद आणि पालाश या घटकांचा समावेश असलेल्या खतांचा हेक्टरी वापर २००१-०२ मध्ये ८०.४३ किलोग्रॅम होता तो आता १६४ किलोग्रॅमपर्यंत वाढला आहे. त्यावर कुणाचे नियंत्रण नाही. योग्य मार्गदर्शनाअभावी खतांच्या अनावश्यक वापरामुळेदेखील संकट निर्माण झाले आहे.
प्रगत महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीची फरफट
राज्य शासनाने सेंद्रिय शेती धोरण जाहीर करून सहा महिने उलटून गेली, पण अजूनही सेंद्रिय शेती सुकाणू समिती आणि अंमलबजावणी समिती गठित झाली नसल्याचे चित्र आहे. एकीकडे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याचे धोरण ठरवायचे आणि दुसरीकडे रासायनिक खतांच्या अर्निबधित वापरासाठी मोकळीक द्यायची, या प्रकारामुळे शेतकरीदेखील संभ्रमित आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-07-2013 at 02:22 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Organic farming policy announced by the state government look difficult to implement