नगर : जिल्हा मराठा शिक्षण प्रसारक समाज संस्थेने नव्या पिढीला संस्थेत सामावून घेऊन नव्या पिढीच्या विचाराला स्थान द्यावे, अशी सूचना खासदार संभाजीराजे यांनी केली. यावेळी त्यांनी हुतात्मा चौथे छत्रपती शिवाजी महाराज समाधिस्थळाच्या सुशोभीकरणासाठी ३० लाख रुपयांचा निधी जाहीर केला. ‘जिल्हा मराठा’ संस्थेसमोरील, लाल टाकी भागातील चौथे छत्रपती शिवाजी महाराज समाधीस्थळ सुशोभीकरणाच्या कामाचे लोकार्पण खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते आज, मंगळवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
स्मायिलग अस्मिता शेतकरी विद्यार्थी संघटनेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप, जिल्हा मराठा शिक्षण प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे, पद्मश्री पोपटराव पवार आदी उपस्थित होते. समाधिस्थळाच्या सुशोभीकरणासाठी आणखी निधीची आवश्यकता भासल्यास आपण संघटनेच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊ, असेही खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. यंदा शाहू महाराज स्मृतिशताब्दी आहे, शताब्दीचा कार्यक्रम नगरमध्येही मोठय़ा प्रमाणात व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आमदार जगताप यांनी संघटनेच्या कामाचे कौतुक केले. झावरे यांनी संस्थेची माहिती देताना छत्रपतींच्या नावामुळेच ‘जिल्हा मराठा’ संस्थेला समाजाचे संरक्षण, समर्थन मिळाल्याचे सांगून शाहू महाराज शताब्दीनिमित्त त्यांच्या नावाने विविध स्पर्धा, चर्चासत्र आयोजित केले जाणार असल्याची माहिती दिली. संघटनेच्या सूचनेनुसार संस्थेच्या माहिती पुस्तिकेत हुतात्मा चौथे छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र व कार्याची माहिती प्रसिद्ध केली जाईल, असेही आश्वासनही त्यांनी दिले. संघटनेचे अध्यक्ष यशवंत तोडमल यांनी प्रास्ताविकात सुशोभीकरणाची माहिती दिली.