सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य आणि योगदानाची दखल घेत अमेरिकेतील ‘पेरियार इंटरनॅशनल’ या संस्थेच्या वतीनेदिला जाणारा ‘के. वीरमणी सामाजिक न्याय पुरस्कार २०१३’ महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांना जाहीर झाला आहे. मुंबईत डिसेंबरमध्ये पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.
रोख एक लाख रुपये व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. भुजबळ यांनी महाराष्ट्रासह देशासाठी दिलेले सामाजिक योगदान, इतर मागासवर्गीयांचा सर्वागीण विकास, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, महिला व अल्पसंख्यांक यांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी केलेले कार्य आणि महात्मा फुले यांचे समतेचे विचार व कार्याचा राष्ट्रीय पातळीवर प्रसार, प्रचार, इतर मागासवर्गीयांचे राष्ट्रीय संघटन या कार्यामुळे भुजबळ यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती पुरस्कार समितीचे अध्यक्ष लक्ष्मण तमील आणि पेरियार इंटरनॅशनल संस्थेचे अध्यक्ष एस. इलंगोवन यांनी दिली आहे.