वीस फुटापर्यंत उंची व वयाची अठरा वर्षांची मर्यादा यामुळे दहीहंडी फोडण्यातील कुतूहल आणि थरार निघून जाईल, असे नमूद करीत कोल्हापुरातील दहीहंडी संयोजकांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे नमूद करीत नियम मोडून दहीहंडीचे आयोजन करण्याचा निर्धार बोलून दाखवला. तर, बाल हक्क समितीच्या प्राध्यापिका साधना झाडबुके यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
सोमवारी दहीहंडी संदर्भात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर निर्णय देताना उंचीची मर्यादा वीस फूट, वयोमर्यादा अठरा वर्ष, मदानात जमिनीवर मॅटचा वापर, दहीहंडीच्या उत्पन्नाच्या स्त्रोताची माहिती संकलन करण्यात यावी, असा आदेश दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे दहीहंडीतील थरार निघून जाईल अशी भावना संयोजकांमध्ये बळावली आहे. कोल्हापुरात सर्वात मोठय़ा दहीहंडीचे आयोजन धनंजय महाडिक युवाशक्तीच्यावतीने केले जाते. पश्चिम महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या दहीहंडीसाठी यंदा तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने वीस फूट उंचीची मर्यादा निश्चित केल्याने या मंडळाच्यावतीने सात थरांसाठी देण्यात येणारे बक्षीस आता कोणत्याही मंडळाला मिळण्याची शक्यता मावळली आहे.
या निर्णयासंदर्भात बोलताना खासदार धनंजय महाडीक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले,  वीस फूट उंचीमुळे खेळातील कुतूहल संपुष्टात येणार आहे. वयाच्या मर्यादा घातल्यामुळे खेळाडू जखमी होणारच नाहीत असे म्हणता येणार नाही. कोणत्याही खेळात पडणे, जखमी होणे असा थोडाफार प्रकार होत असतो, पण न्यायालयाच्या निर्णयामुळे दहीहंडी खेळाचे स्वरुप आमूलाग्र बदलणार आहे. दहीहंडी स्पध्रेवेळी वाळू टाकली तरी खेळाडू पाय घसरतो म्हणून तक्रार करीत असतात. आता मॅट टाकले तर त्यांच्याकडून प्रतिसाद मिळण्याची शक्यताच कमी आहे. यामुळे नियम मोडून दहीहंडीचे आयोजन करण्यात येईल. स्पर्धा पदरच्या पशाने आयोजित केली जात असल्याने आíथक स्रोताची चौकशी केली तरी त्यास सामोरे जाण्याची तयारी आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी मुंबई-पुणे येथील संयोजकांशी चर्चा सुरू आहे. दहीहंडी संयोजनातील मोठे नाव असलेले वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच भूमिका स्पष्ट केली जाईल.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष व दहीहंडीचे जुने खेळाडू उल्हास पाटील यांनी उंचीचे बंधन चुकीची असल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे. किमान पंचवीस ते तीस फूट उंची असेल तर दुखापतीशिवाय दहीहंडी फोडता येईल असे नमूद करून त्यांनी वयोमर्यादा चौदावर्षांहून अधिक असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
बाल हक्क समितीच्या प्राध्यापिका साधना झाडबुके यांनी दहीहंडीची उंची नेमकी किती असावी याबाबत आपण अधिकारवाणीने सांगू शकत नाही, असे स्पष्ट करतानाच वर्यामर्यादा चौदाहून अधिक असण्याची गरज व्यक्त केली. बाल हक्क प्रतिबंधक कायद्यानुसार चौदा वर्षांखालील बालकांचा कोठेही वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. नाजूक वयाची मुले उंचीवरून पडल्यास त्यांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता अधिक असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा