कोल्हापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीने उद्या सोमवारी बेळगाव येथे महामेळाव्याचे आयोजन केले आहे. तर या महामेळाव्याला जाण्याच्या तयारीत असलेले सीमा प्रश्न तज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांना बेळगाव प्रवेश बंदी करण्याचा निर्णय कर्नाटक प्रशासनाने पूर्वसंध्येला घेतला आहे. बेळगावसह सीमाभागातील लोकांनी महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी लढा उभा केला आहे. त्याला शह देण्यासाठी कर्नाटक शासन कुरघोडी करीत असते. बेळगाव येथे विधानसभा बांधण्यात आली असून तेथे हिवाळी अधिवेशन घेतले जाते.
अधिवेशनाला सुरुवात होण्याच्या दिवशी त्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव मधील टिळकवाडी व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळाव्याचे आयोजन दरवर्षीप्रमाणे केले आहे. याकरिता महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराजे देसाई, सीमा प्रश्न तज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने आदींना निमंत्रित केले आहे.
हेही वाचा: बेळगावात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते अनावरण
या अधिवेशनाला जाण्याची तयारी खासदार माने यांनी केली आहे. मात्र सीमा प्रश्नावरून अलीकडे निर्माण झालेल्या तणावाचे कारण देत बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी प्राप्त अधिकारानुसार खासदार माने यांना बेळगाव जिल्हा प्रवेश बंदी आदेश लागू केला आहे. कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेतल्याचे किरकोळ कारण त्यांनी पुढे केले आहे. त्यामुळे खासदार माने कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.