महाविकास आघाडी सरकारचा मित्र पक्ष असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना आता सरकारमधून बाहेर पडणार असल्याची चिन्हं निर्माण झाली आहे. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी तसे संकेतही दिले आहेत. तर, दुसरीकडे भाजपा आणि राजू शेट्टी यांच्यातील जवळीक वाढत आहे, कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी भाजपा नेत्यांनी राजू शेट्टी यांची काल भेट घेतली होती. यामुळे राजू शेट्टी हे महाविकास आघाडीची साथ सोडून, भाजपाशी हातमिळवणी करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज विरोधी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
राजू शेट्टी भाजपाबरोबर येण्याची शक्यता आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना अजून माझी या संदर्भात काही चर्चा झालेली नाही. “मूळातच राजू शेट्टी हे आमच्यासोबत होते, काही कारणांनी ते पलिकडे गेले. आमची यामध्ये एवढीच अपेक्षा आहे की, सोबत कोण येणार आहे, नाही हे प्रत्यक्ष कळल्याशिवाय त्याच्यासंदर्भात पुढली प्रतिक्रिया देणं योग्य नाही.”
तसेच, “ फक्त मला एकच वाटतं की जो कोणी शेतकरी नेता असेल, त्याने जर मागील काळात बघितलं तर जेवढे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे पंतप्रधान मोदींनी घेतले, तेवढे कोणीच घेतले नाही. त्यासोबतच विशेषता साखर कारखानदारी करता आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जे मोदी सरकारने केलं ते कोणीच केलं नाही. त्यामळे मला असं वाटतं की याचा विचार प्रत्येकानेच केला पाहिजे, मात्र अद्याप माझी त्यांची कुठलीही चर्चा झालेली नाही.” असं म्हणत फडणवीस यांनी यावर अधिक बोलणं टाळलं.
राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? केलं सूचक विधान; म्हणाले, “येत्या ५ एप्रिल रोजी…”!
राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर संवाद साधत नसल्याचा आरोप केला आहे. “या सरकारला अडीच वर्ष होत आली आहेत. महाविकास आघाडी सरकारचं समीक्षण करण्याची आता वेळ आली आहे. ज्या उद्देशाने किमान समान कार्यक्रमावर ही महाविकास आघाडी अस्तित्वात आली, त्या किमान समान कार्यक्रमाचं काय झालं?” असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
राजू शेट्टी यांनी २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला होता. राज्य सरकारने सभागृह नेता म्हणून उद्धव ठाकरेंची निवड करताना सूचक म्हणून राजू शेट्टींचं नाव घेतलं होतं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पाठिंबा काढल्यामुळे राज्य सरकारच्या स्थैर्याला फारसा धक्का लागणार नसला, तरी आघाडीतील एक मित्रपक्ष नाराज होऊन बाहेर पडला, तर जनमतावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे.