बीड जिल्ह्य़ाचे सुपुत्र व केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण बीड जिल्हा शोकसागरात बुडाला. सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी मुंडे यांना श्रद्धांजली वाहताना मुंडे यांच्या जाण्यामुळे बीडसह मराठवाडय़ाची, राज्याची व देशाची मोठी हानी झाली असल्याची भावना व्यक्त केली. मुंडे यांच्या निधनामुळे आलेले पोरकेपण त्यांच्या नसण्याची सल सतत देणार असल्याची सामूहिक प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेमध्ये व्यक्त होत आहे.
पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर – मुंडे हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते. कठीण परिश्रम व संघर्षांतून त्यांनी आपले स्थान निर्माण केले. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला.
राज्यमंत्री सुरेश धस – मुंडेंचे नेतृत्व पराकोटीच्या संघर्षांतून तयार झाले होते. त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपासून केली. निवडणुकीचा प्रचार संपला की, राजकारणातील मतभेद ते बाजूला ठेवत. त्यांच्या निधनाने बीडसह राज्याचे मोठे नुकसान झाले. विशेषत: ऊसतोडणी कामगार पोरका झाला.
माजी मंत्री शिवाजीराव पंडित – मुंडेंच्या निधनाचे वृत्त कळताच अंतकरणात कालवाकालव झाली, मोठा धक्का बसला. बराच वेळ हे खोटेच वाटत होते. लोकांना जमवणारा लोकनेता ही उपाधी गोपीनाथरावांनी नक्कीच सार्थ ठरवली. आम्हीही राजकारण केले. परंतु आमच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्यांना घेऊन चालणारे राजकारण गोपीनाथरावांनी केले. प्रचंड मतांनी विजयी होऊन केंद्रात प्रथमच कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने बीडमध्ये आनंद पसरला होता. लोकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. आमच्यानंतरच्या पिढीमध्ये गोपीनाथरावांनी राजकारणात मारलेली मजल कोणताच नेता मारू शकेल, असे वाटत नाही. असा नेता होणे नाही आणि तसे राजकारणही होणार नाही. बीड जिल्ह्याचा वाघ गेला.
माजी आमदार उषाताई दराडे – ओबीसींचे कणखर नेतृत्व व भावी मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले. प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवणारे आणि सर्वसामान्यांच्या दुखात पाठीशी राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून मुंडे यांची ओळख होती. मराठवाडा विकास आंदोलनात त्यांची आपणास साथ लाभली. या आंदोलनात त्यांनी तुरुंगवासही भोगला.
आमदार अमरसिंह पंडित – विलासराव देशमुख यांच्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली जाण्यामुळे मराठवाडा पोरका झाला. त्यांच्या नेतृत्वाखाली काही काळ काम करण्याची संधी आपणास मिळाली, हे मी भाग्याचे समजतो. असामान्य संघटनकौशल्य असलेला नेता गमावल्याचे दुख होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा