हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ, ऑस्कर २०२२च्या दरम्यान घडलेल्या घटनेमुळे चर्चेत आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारा अभिनेता विल स्मिथ सुत्रसंचालक क्रिस रॉकवर अचानक चिडला आणि त्याने स्टेजवर त्याच्या जाऊन कानशिलात लगावली. या प्रकरणाची जगभरामध्ये चर्चे असतानाच या सर्व घटनाक्रमाचा संबंध शिवसेनेनं थेट महाराष्ट्राच्या राजकारणाशी जोडत सातत्याने शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांना, ‘देसी क्रिस रॉक’ असं म्हटलंय. विशेष म्हणजे यावेळी शिवसेनेनं शिवसैनिकांची तुलना विल स्मिथसोबत केली आहे. तसेच केंद्र सरकार आता क्रिस रॉकला सुरक्षा पुरवणार का असा प्रश्नही शिवसेनेनं उपस्थित केलाय. या घटनाक्रमाच्या निमित्ताने शिवसेनेला काही दिवसांपूर्वी नितीश कुमार यांच्यासोबत घडलेल्या प्रकरणापासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत घडलेल्या अशाच प्रकाराची आठवणही झालीय.
नक्की पाहा >> Video : आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात; अचानक ब्रेक दाबल्याने झाला अपघात
संयमाचा बांध तुटला व…
“ऑस्कर पुरस्कार सोहळा सुरू असतानाच त्या मंचावर आणखी एक नाट्य घडले. सुपरस्टार विल स्मिथने ‘अँकर’ क्रिस रॉकच्या सणसणीत कानाशिलात लगावली. या ‘थप्पड’ची गुंज म्हणे जगभरात ऐकू आली. चित्रपट किंवा नाट्य कलाकार कितीही मोठे असोत, पण ते लेखकाने लिहून दिलेले संवादच पडद्यावर बोलत असतात आणि दिग्दर्शकाच्या सूचनेनुसार अभिनय करीत असतात, पण ऑस्कर पुरस्काराच्या आंतरराष्ट्रीय मंचावर कानशिलात लगावण्याचे जे नाट्य घडले ते अनपेक्षित होते. ते नाट्य होते की सत्य होते हे क्षणभर रसिक प्रेक्षकांना कळलेच नाही. काहीजण ते दृश्य पाहून अवाक् झाले. काहींनी टाळ्या वाजवल्या तर काहींना वाटले, हा तो मंच नाही. येथे असे घडायला नको होते, पण सुपरस्टार विल स्मिथच्या संयमाचा बांध तुटला व त्याच्याकडून हे कृत्य घडले,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.
नक्की पाहा हे फोटो >> Photos: कुणकेश्वराचं दर्शन, लेझीम अन् बरंच काही; आदित्य ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचे खास फोटो
पवारांचाही उल्लेख…
“ऑस्कर सोहळ्यात क्रिस रॉकच्या कानफटात मारण्याआधी दोन दिवस पाटण्यात एका माथेफिरूने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कानफटात मारण्याचा प्रयत्न केला. हा काही अतिरेकी किंवा दहशतवादी हल्ला नव्हता, पण ज्याने नितीश कुमारांच्या बाबतीत हे कृत्य केले त्यास माथेफिरू ठरवून जग मोकळे झाले. शरद पवारांपासून अनेक नेत्यांपर्यंत असे प्रसंग सार्वजनिक कार्यक्रमांत ओढवले आहेत. पंडित नेहरूंनाही स्वातंत्र्यानंतर फाळणीतील निर्वासितांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे, पण ‘ऑस्कर’च्या मंचावर घडलेल्या कृत्याचे वर्णन एकाच वाक्यात करता येईल, ते म्हणजे क्रिस रॉकने बोलण्यातला ताळतंत्र सोडला. भावना दुखावल्या म्हणून विल स्मिथचा संयम सुटला व त्याने कानशिलात लगावली,” असं विश्लेषण शिवसेनेनं केलंय.
शिवसैनिकांशी तुलना…
“क्रिस रॉक हा स्टेजवर डॉक्युमेंटरी फिचरसाठी ऑस्कर पुरस्कार देण्यासाठी आला होता. या वेळी क्रिसने विल स्मिथची पत्नी जेडा स्मिथ हिच्यावर एक ‘हलकी’ कॉमेंट केली. ‘जी. आय. जेन – २’ या चित्रपटाबाबत बोलताना रॉक याने स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची मस्करी केली होती. जेडाच्या डोक्यावर कमी केस असल्यामुळे तिला हा चित्रपट मिळाला होता, अशी कमेंट करताच विल भडकला व त्याने स्टेजवर चढून रॉकच्या कानाखाली मारली. मुळात जेडा ही अॅलोपेसिया नावाच्या आजाराने त्रस्त असून त्यामुळे तिच्या डोक्यावरचे केस कमी होत आहेत. त्यामुळे त्यावरून रॉक याने केलेली मस्करी विल याला असह्य झाली आणि त्याने एखाद्या विद्रोही शिवसैनिकाप्रमाणे क्रिस रॉकवर हल्ला केला,” असा उल्लेख या लेखामध्ये करत विल आणि शिवसैनिकांची तुलना करण्यात आलीय.
नक्की वाचा >> “येड्यांच्या मागं लागली ईडी; जाता जाता पवारांनी कधी गिळले हे शिवसेनेला सुद्धा…”
भान अन् बेभान…
“क्रिस रॉक प्रकरणाचा धडा असा की, अतिरेक कराल तर कोणत्याही मंचावर तुमच्या कानशिलात बसू शकते. आता क्रिस रॉकच्या कानशिलात मारल्याबद्दल महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी एखादे निषेधाचे पत्रक वगैरे काढून त्यास विशेष सुरक्षा देण्याची मागणी केली आहे काय ते पाहावे लागेल. ‘ऑस्कर’चा सोहळा परदेशी भूमीवर असला तरी हरकत नाही. भाजपा हा आंतरराष्ट्रीय पक्ष आहे. रॉकसारखे पांचट लोक त्यांना नेहमीच हवेहवेसे वाटत असतात. ऑस्करचा सोहळा लॉस एंजेलिसला झाला आणि तेथेही भाजपाला प्रिय वाटणारे नग आहेत. रॉकने व्यक्तिगत पातळीवर टीका केली. कमरेखालचे विनोद केले. त्यामुळे याला फटके पडले. विल स्मिथ याने आता झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. भावनेच्या भरात आपण हे पाऊल उचलले असे त्याने म्हटले आहे. त्याचे म्हणणे योग्यच आहे, पण रॉक याने जर भान ठेवले असते तर विल स्मिथ ‘बेभान’ झालाच नसता,” असा टोला शिवसेनेनं या लेखातून लगावलाय.
महाराष्ट्राच्या राजकारणाशी जोडला संबंध…
पुढे या साऱ्या प्रकरणाचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध जोडत शिवसेनेनं विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपावर निशाणा साधलाय. “सध्या महाराष्ट्रातील भाजपानेदेखील क्रिस रॉकप्रमाणे वर्तन सुरूच ठेवले आहे. क्रिस रॉकपेक्षा खालच्या पातळीवर ते पोहोचले आहेत. भाजपात नुकतेच वऱ्हाडी म्हणून घुसलेले नगरचे विखे-पाटील (धाकली पाती) यांनीही नुकतेच क्रिस रॉकप्रमाणेच वक्तव्य केले. त्यामुळे राष्ट्रवादीचे ‘विल स्मिथ’ जयंत पाटील भडकले. सत्तेसाठी एकत्र आलेल्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी-शिवसेनेस विखेंनी नवरा-बायकोची तर काँग्रेसला बिन बुलाये वऱ्हाडींची उपमा दिली, पण या ‘क्रिस रॉक’ला जयंत पाटलांनी अशी काही शाब्दिक कानशिलात लगावली की, लोकांना तीन फुल्यांचा वापर करून पाटलांचे ‘फटके’ वर्णन करावे लागले. ‘नवरा-बायको, वऱ्हाडी अशा बिरुदावल्या आम्हाला देणाऱ्या षंढांबाबत काहीही बोलण्याची गरज नाही. कारण षंढ कुठल्याच भूमिकेत नसतात,’ असे जयंतरावांनी सुनावले. आता षंढ हा शब्द काही असंसदीय असल्याचे वाटत नाही, पण जयंतरावांचा संताप अनावर झाला व त्यांनी विखेंना ‘एक लोहार की’ लगावून भाजपातील सर्वच क्रिस रॉकना त्यांची जागा दाखवली,” असा टोला शिवसेनेनं लगावलाय.
गावोगावी थपडा बसल्याशिवाय राहणार नाही
“महाराष्ट्राचे वातावरण भाजपातील ‘कॉमिक’ क्रिस रॉकनी साफ नासवले आहे. जनाची आणि मनाची ‘लज्जा’ न बाळगता त्यांच्या नौटंक्या सुरूच आहेत व त्याबद्दल त्यांना ‘ऑस्कर’ सोहळ्याप्रमाणे गल्लीबोळात, गावोगावी थपडा बसल्याशिवाय राहणार नाहीत. भाजपाचे ‘टवाळ’ पुढारी महाराष्ट्राच्या बदनामीची सुपारी घेतल्याप्रमाणे बेबंद वागत आहेत. मर्यादांचे भान राखायला ते तयार नाहीत. कॉमिक क्रिस रॉकनेही मर्यादा सोडली तेव्हा भरमंचावर त्यास थप्पड खावी लागली. त्या थपडेनंतर तो कोलमडला. हे सुद्धा जगभरात दिसून आले,” असं शिवसेनेनं म्हटलंय.
सुरक्षा पुरवणार का?
“भाजपाचे ‘देशी’ क्रिस रॉक गेल्या अडीच वर्षांपासून उठसूट महाविकास आघाडीच्या बाबतीत घाणेरड्या पद्धतीने ‘नौटंकी’ करीत आहेत. स्वतः भ्रष्टाचाराने बरबटले असताना दुसऱ्याकडे बोटे दाखवून थयथयाट करीत आहेत. असल्या नौटंकीस एक दिवस कानशिलात बसणारच! आता ही मंडळी ‘क्रिस रॉक’ला पद्मविभूषण देणार की दिल्लीतून त्यास विशेष सुरक्षा पुरवणार, ते पाहावे लागेल,” अशा शाब्दिक चिमटा लेखाच्या शेवटी काढण्यात आलाय.