जगप्रसिद्ध भारतीय तत्त्वज्ञ ओशो यांच्या पुण्यातील आश्रमात त्यांच्या अनुयायांनी धुडगूस घातला आहे. आश्रम व्यवस्थापनाचा दबाव झुगारून अनुयायी आश्रमात घुसले. आश्रम व्यवस्थापनाने अनुयायांना संन्यासी माळा घालून आश्रमात येण्यास बंदी घातल्याने अनुयायी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जदेखील केला.
पुण्यातील ओशोंच्या आश्रमात अनुयायांना संन्यासी माळा घालून प्रवेश देण्यास आश्रम व्यवस्थापनाने मनाई केल्यानंतर शेकडो अनुयायी या माळा घालून जबरदस्तीने आश्रमात घुसले असल्याची माहिती टीव्ही ९ मराठीने दिली आहे. जगभरात २१ मार्च हा दिवस ओशोंचे अनुयायी ‘संबोधी दिन’ म्हणून साजरा करतात. काल (मंगळवार, २१ मार्च) जगभरातले ओशोंचे अनुयायी ओशोंच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आश्रमात आले होते. यापैकी बऱ्याच अनुयायांच्या गळ्यात सन्यासी माळा होत्या.
हे ही वाचा >> “आता तरी माझं ऐकाल का?” छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं, “त्यांनी मला…”
२०० अनुयायी गेट तोडून आत घुसले
संन्यासी माळा घालून आलेल्या अनुयायांना आश्रम व्यवस्थापनाने सांगितले की, तुम्हाला प्रवेश देता येणार नाही. त्यानंतर हे अनुयायी आक्रमक झाले. दरम्यान, या अनुयायांनी गेट तोडून आत प्रवेश केला. दरम्यान, १५० ते २०० अनुयायी आत घुसले असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच कोरेगाव पार्क पोलिसांनी अनुयायांना समजावण्याचा प्रयत्न केला पण अनुयायी काही ऐकले नाहीत. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.