राज्यात एकाच टप्प्यात विधानसभेसाठी मतदान होत असल्याने यंदा सांगली पोलिसांच्या मदतीला गुजरात, चेन्नईसह इंडो-तिबेटियन सुरक्षा दलाचे जवान तनात करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी दिली. जिल्ह्यात उपलब्ध असणाऱ्या पोलीस दलावर बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण पडणार नाही याची दक्षता घेण्यात आली असली तरी पोलिसांच्या रजा, सुटय़ा गणेशोत्सवापासून बंद करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात राज्य राखीव दलाच्या प्रत्येकी १०० शिपायांच्या सहा कंपन्या सध्या तनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय गुजरात आणि चेन्नई पोलीस दलाच्या १०० कर्मचाऱ्यांच्या दोन कंपन्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. इंडो-तिबेटियन सीमा सुरक्षा दलाच्या सहा कंपन्या निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी मागविण्यात आल्या असून, यामध्ये ६०० कर्मचारी असतील. सीमा सुरक्षा दलाचे जवान येत्या दोन दिवसांत सांगलीमध्ये दाखल होत आहेत.
मतदान केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात असल्याने केंद्राबाहेरील बंदोबस्तासाठी मोठय़ा प्रमाणावर पोलीस कर्मचाऱ्यांची गरज असते. यापूर्वी दोन अथवा तीन टप्प्यांत निवडणुका होत असल्याने अन्य जिल्ह्यांतील पोलीस यंत्रणा बंदोबस्तासाठी वापरता येत होती. यंदा एकाच वेळी संपूर्ण राज्यात मतदान होत असल्याने गृह विभागाला पोलीस कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्याने अन्य राज्यांतील पोलीस कुमक मागविण्यात आली आहे.
जिल्ह्यामध्ये २३३८ मतदान बूथ असून त्याचे ९९ विभाग करण्यात आले आहेत. प्रत्येक विभागासाठी एका पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हा बंदोबस्त तनात करण्यात येत आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक वादातून कोणतीही अप्रिय घटना घडलेली नाही. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी १४ गुन्हे दाखल झाले असून १९५५ शस्त्रे परवानाधारकांकडून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.
पोलीस दलाने निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर १९५५ व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली असून, २७ जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव प्रांत विभागाकडे धाडण्यात आले आहेत. या काळात फरारी असणाऱ्या १६ जणांना अटक करण्यात आली आहे. निवडणूककाळात त्रासदायक ठरतील अशा ११९ जणांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांना ठराविक भागात प्रवेश करण्यास मनाई करण्यात येणार आहे.
निवडणूककाळात जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी ८ ठिकाणी तपासणी नाके बसवण्यात आले असून, रोख रक्कम ने-आण होते का याची तपासणी करण्यासाठी पोलिसांची गस्ती पथके कार्यरत आहेत. रात्री निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ ढाबा चालविल्याप्रकरणी ४७ ढाबाचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

Story img Loader