Devendra Fadnavis Birthday : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसादिवशी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कोणताही सोहळा करू नये, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यांनी आज ट्वीट करून यासंदर्भातील माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून आज यासंदर्भातील माहिती देण्यात आली. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने पक्षाचे कोणतेही नेते, कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार नाही आणि वृत्तपत्रातून टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाही, असे आवाहन भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आल्याचे भाजपाचे कार्यालय सचिव मुकुंद कळकर्णी यांनी कळवले आहे”, असं ट्वीट करण्यात आलं आहे.
हेही वाचा >> “यापुढे बरंच काही…”, किरीट सोमय्यांच्या कथित व्हायरल व्हिडीओनंतर संजय राऊतांचं सूचक ट्वीट
“होर्डिंग, बॅनर, जाहिराती असे कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे, त्यांनी विविध सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहनसुद्धा करण्यात येत आहे”, असंही ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसांत राजकीय नेत्यांनी आपला वाढदिवस होर्डिंगशिवाय साजरा करण्याचे ठरवले आहे. भेटायला येताना पुष्पगुच्छ वगैरे घेऊन न येता सामाजिक कार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भातील आवाहन केले होते. तसंच, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही अशीच भूमिका घेतली होती. आता देवेंद्र फडणवीसांनीही सामाजिक कार्य करून वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन केले आहे.