Deepak Kesarkar on Sanjay Raut: संजय राऊत दोन हजार कोटींचा जो आरोप करत आहेत, त्यावर रितसर केस दाखल व्हायला हवी. आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यासंदर्भात निर्णय होईल. पक्षाच्या विरोधात ते काम करत आहेत, पक्षाच्या हिताच्या विरोधात बोलत आहेत. त्यामुळे त्यांचे राज्यसभेचे त्यांचे सदस्यत्व का रद्द करु नये, या संदर्भात एक कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यावर संजय राऊत यांना नोटीस दिली गेली पाहीजे, असे माझे मत मी राष्ट्रीय कार्यकारिणीत मांडणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली.
संजय राऊत यांचा जामीनही रद्द करावा
दीपक केसरकर पुढे म्हणाले, “संजय राऊत यांच्याविरोधात प्रस्तावत आणून बेलगाम वक्तव्य करणाऱ्या लोकांना लगाम बसविण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच ईडीने त्यांना जामीन देत असताना काही अटी-शर्ती घातलेल्या आहेत. तरीही ते आपल्या वक्तव्यातून भीती निर्माण करत आहेत. त्यामुळे आम्ही रितसर तक्रार न्यायालय, ईडी आणि सरकारडे करुन त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणार आहोत. अतिशय घाणेरड्या भाषेत ते बोलत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही करणार आहोत.”
“शिवसेना संपविण्याच्या संदर्भात संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काय बोलणं झालं? याबद्दल मला माहिती नाही. परंतु राष्ट्रवादीच्यावतीने त्यांनी शिवसेना संपविण्याचा प्रयत्न केला. पण शिवसेना संपू शकली नाही. आम्ही उठाव केला, म्हणून शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आली. मात्र आम्ही पहिला आणि दुसरा क्रमांक न पाहता युतीमध्ये एकत्र राहू. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत तडजोड करणार नाही”, अशी ठाम भूमिका दीपक केसरकर यांनी मांडली.
हे वाचा >> पृथ्वी शॉच्या अडचणी वाढू शकतात; जामीन मिळताच सपना गिलने दाखल केले गंभीर गुन्हे
उद्धव ठाकरेंचीही जीभ घसरायला लागली
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला जाणार आहेत. आमचे धनुष्यबाण हे रामाचे धनुष्यबाण आहे. राम आणि धनुष्यबाण वेगळे करता येणार नाही. धनुष्यबाणाचे पावित्र आणि बाळासाहेबांच्या विचारांचे पावित्र आम्ही राखू. आतापर्यंत उद्धव साहेब हे चांगले बोलणारे नेते म्हणून ओळखले जात होते. पण आज उद्धवसाहेबांची जीभ देखील घसरायला लागली. आमच्यासारखे लोक त्यांचा आदर करतात. त्या आदराला त्यांनी पात्र राहिले पाहीजे. उद्धवसाहेब आणि संजय राऊत या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत. उद्धव साहेबांनी उद्धव साहेबांसारखेच राहावे.”, असा सल्ला केसरकर यांनी दिला.
उद्धव ठाकरे पॉवरफुल
उद्धव साहेब काहीही करु शकतात, असे सांगताना केसरकर म्हणाले की, बाळासाहेबांनी दिलेली घटना ते रद्द करु शकले. त्यामुळे ते काहीही करु शकतात. ते निवडणूक आयोग रद्द करण्याइतके पॉवरफुल आहेत.