लोकसभा निवडणुकीचे टप्पे याच महिन्यात सुरु होतील. महाविकास आघाडीने कंबर कसली आहे तशीच भाजपा आणि महायुतीनेही राज्यात जोरदार तयारी केली आहे. प्रचारसभांचा धडाका सुरु करण्यात आला आहे. चंद्रपूरमध्ये नरेंद्र मोदींनी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ सभा घेतली आणि महाराष्ट्रातल्या प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर आता भाजपा नेत्यांच्या सभा होत आहेत. पियूष गोयल यांच्या प्रचारासाठी काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मुंबईत मागच्या दहा वर्षात जेवढी विकासकामं मोदींनी केली तो फक्त ट्रेलर होता. येत्या पाच वर्षात मुंबईसह देशाचा विकास नरेंद्र मोदी करणार आहेत. उद्धव ठाकरेंकडे मागची २५ वर्षे मुंबई महापालिका होती त्यांनी मुंबईकरांसाठी आणि मुंबईच्या विकासासाठी केलेलं एक काम दाखवावं असं आव्हानच देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. तसंच पियूष गोयल हे रेकॉर्ड ब्रेक मतांनी उत्तर मुंबईतून निवडून येतील हे माहीत असल्यानेच काँग्रेसला इथे उमेदवार मिळत नाही तसंच उबाठाने ही जागा स्वतःकडे घेतली नाही असंही फडणवीस म्हणाले.
आम्ही मुंबईचा विकासही करतो आहोत
“गरीब कल्याणाचं स्वप्न मोदींनी पाहिलं. २५ कोटी गरीबांना दारिद्र्यरेषेबाहेर काढलं. येत्या काळात मुंबईतही आपल्याला बदल करायचा आहे. मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आहे त्याचाही विकास करायचा आहे. मेट्रोचं जाळं आपण मुंबईत उभारतो आहोत. बांद्रा वर्सोवा सी लिंकचं कामही सुरु झालं आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरचं ट्रॅफिक कमी करण्याचं काम आम्ही करतो आहोत. मोदी सरकार आणि महायुती सरकार करतं आहे. ही निवडणूक सामान्य माणसाच्या विकासाची निवडणूक आहे. देशाची कमान मोदींच्या हाती गेली पाहिजे.” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरेंवर जोरदार टोलेबाजी
काँग्रेस पक्ष आणि उबाठा वाट्टेल ती वक्तव्यं करतात ती पाहून मला आश्चर्य वाटतं. मोदींनी १० वर्षात जे परिवर्तन केलं, मजबूत भारत तयार केला. मुंबईकरांना मी आवाहन करतो की तुम्ही भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससमोरचं बटण दाबाल तर ते मत मोदींना मिळेल. उद्धव ठाकरेंचे नेते कोण? राहुल गांधी. कांग्रेसचे नेते कोण? राहुल गांधी. आमचे नेते कोण नरेंद्र मोदी. एकनाथ शिंदे, अजित पवारांचे नेते कोण? नरेंद्र मोदी. आमची अशी ट्रेन आहे ज्या ट्रेनला मोदींचं इंजिन आहे. आम्ही त्याला बोग्या लावल्या आहेत. आमच्या ट्रेनमध्ये सामान्य माणसाला बसायची जागा आहे. पण इंडि आघाडी तयार झाली आहे त्यात प्रत्येकजण स्वतःला इंजिन समजतो. एक इंजिन बोरीवलीकडे नेतो तर दुसरा दुसरीकडे नेतो. इंजिन कितीही पॉवरफुल असलं तरी त्यात बसायला जागा फक्त ड्रायव्हरला असते. आमचं असं नाही. आम्ही मोदींच्या नेतृत्वात काम करतो आहोत. आमची ट्रेन, आमच्या बोग्यांमध्ये प्रत्येकाला बसण्याची जागा आहे. विकासाची ट्रेन आम्ही घेऊन जातो आहोत. आता मुंबईकरांनी विचार करायचा आहे की मोदींच्या ट्रेनमध्ये बसायचं की राहुल गांधींच्या न चालणाऱ्या इंजिनमध्ये. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
हे पण वाचा- महायुतीला पाठिंबा देताच देवेंद्र फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचे आभार, म्हणाले, “भक्कम महाराष्ट्राच्या..”
राज ठाकरेंचं कौतुक
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, खरं इंजिन आमच्याबरोबर आहे. मुंबईतल्या चालणाऱ्या इंजिनने सांगितलं मोदींनाच पाठिंबा. राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं देशाचा विकास मोदीच करु शकतात. त्यामुळे मोदींना त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला. मी राज ठाकरेंचे आभार मानतो की देशाला काय हवं आहे त्याची नाडी त्यांना कळली म्हणून त्यांनी मोदींना आणि महायुतीला पाठिंबा दिला. असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.