राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीकडून मुंबईत महामोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला लाखोंच्या संख्येत जनतेकडून पाठिंबा मिळाल्याचा दावा महाविकास आघाडीकडून केला जात असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या मोर्चाचे वर्णन ‘नॅनो’ मोर्चा असं करत महाविकास आघाडीला टोला लगावला होता. यावर आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
आज प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी “माझं म्हणणं आहे की आमचा मोर्चा हा देवेंद्र फडणवीस साईज होता.” असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला एका वाक्यात उत्तर दिलं.
या अगोदर शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी एक व्हिडीओ ट्वीट करून मोर्चाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद दर्शवण्याचा प्रयत्न केला.
संजय राऊतांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओत भगवे झेंडे हातात घेतलेल्या लोकांची गर्दी दिसत आहे. ही गर्दी महामोर्चात आलेल्या लोकांनी केल्याचा दावा राऊतांनी केला आहे. याशिवाय त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “देवेंद्र फडणवीस ज्यास ‘नॅनो’ मोर्चा म्हणून हिणवलं, तो हाच मोर्चा आहे. देवेंद्रजी, असं वागणं बरं नाही,” असा टोलाही राऊतांनी लगावला आहे. मात्र या व्हिडीओवर देवेंद्र फडणवीसांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. संजय राऊतांनी ट्वीट केलेला व्हिडीओ मराठा मोर्चातील असू शकतो, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. या व्हिडीओची मी पडताळणी करणार आहे, असंही फडणवीस म्हणाले आहेत. ते अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.