“आपला आवाज केवळ बीड जिल्ह्यातच नाही, मुंबईपर्यंत नाही तर दिल्ली पर्यंत पोहचतो. हा कुठल्या पक्षाचा मेळावा नाही. हा कोणत्या कार्यकर्त्यांचा मेळावा नाही. हा मेळावा आहे भगवानबाबांच्या भक्तांचा आणि गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाचा.” असं खासदार प्रीतम मुंडे बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे आज(शुक्रवार) भगवान भक्तीगडावरील दसऱ्या मेळाव्यात बोलताना म्हणाल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रसंगी खासदार प्रीतम मुंडे यांनी सांगितले की, “आज या मेळाव्याला येत असताना मागील काही दिवसांमध्ये एवढी अतिवृष्टी झाली की लोकांच्या मनात थोडी शंका होती, की मेळवा होईल का नाही? किती मोठा होईल? ज्या लोकांच्या मनात शंका होती त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की, जरा डोळे उघडून हा उसळलेला जनसमुदाय पाहा. हा भगवानबाबांचा आशीर्वाद आणि मुंडे साहेबांच्या संस्करांचं प्रतीक आहे. आज विजयादशमीचा दिवस आहे, नवरात्रीचा सण हा आपण देवीचा सण म्हणून साजरा करतो. देवीची अनेक रूपं बघता येतात, देवीचं सोज्वळ, मायाळू, सहनशील रूप आपण बघतो. पंकजाताई पालकमंत्री असताना आपणे रूप बघितलेलं आहे. पण नुकतीच दुर्गाष्टमी पार पडली. जेव्हा समाजामध्ये अराजकता पसरते, जेव्हा समाजात विषमता पसरते. जेव्हा समाजात अन्याय पसरतो. तेव्हा तीच देवी दुर्गेचा अन्याय घेऊन त्या अन्यायाला संपवल्याशिवाय राहत नाही. याचं देखील हा विजयादशमीचा सण हा प्रतीक आहे. म्हणून आज मी आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देते.”

तसेच, “आज इथे आलेला प्रत्येक माणूस हा मनात काहीतरी अपेक्षा घेऊन आलेला आहे. हा मेळावा कोणाचा आहे? काल मला माध्यमांमधील काही लोकांनी विचारलं, की मुंडे परिवारासाठी हा मेळावा फार महत्वाचा आहे. मी म्हणाले हो मुंडे परिवारासाठी हा मेळावा महत्वाचा आहे, कारण गोपीनाथ मुंडे परिवार म्हणजे पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे नाही, तर इथे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला जनसमुदाय, मंचावरील सगळी लोकं जशी आमच्या परिवाराचा भाग आहेत. तेवढीच किंवा त्यापेक्षाही जास्त आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एवढ्या उन्हात येऊन सकाळपासून थांबलेले तुम्ही सर्वजण देखील आमच्या परिवाराचा भाग आहात. म्हणून मुंडे परिवारासाठी हा दसरा मेळावा अतिशय महत्वाचा आणि लक्षवेधी ठरतो. आपला मेळावा हा कोणत्या पक्षाचा मेळावा नाही, हा कोणता राजकीय मेळावा नाही. हा मेळावा हा त्या प्रत्येक वंचित माणसाचा मेळावा आहे, ज्याचं हातावरचं पोट आहे, ज्याची समजामधून काहीतरी अपेक्षा आहे. ज्याला आपला नंबर कधी तरी येईल, या विकासाच्या गंगेमध्ये ही अपेक्षा आहे.” असंही प्रीतम मुंडे यांनी बोलून दाखवलं.

याचबरोबर, “इथं आल्यावर तुम्हाला काय मिळतं? एक उर्जा मिळते, की पुढचं येणार वर्ष तुम्हाला रोजच्या आयुष्यात जो संघर्ष तुम्हाला करायचा आहे, त्यासाठी प्रेरणा मिळते. यासाठी तुम्ही इथे सर्वजण येतात. म्हणून आपल्या मेळाव्याचं वेगळेपण हे आहे, हा कुठल्या पक्षाचा मेळावा नाही. हा कोणत्या कार्यकर्त्यांचा मेळावा नाही. हा मेळावा आहे भगवानबाबांच्या भक्तांचा आणि गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाचा.” असं प्रीतम मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Our voice reaches not only beed district but also delhi pritam munde msr