सोलापूर : उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनी योजनेच्या एकूण ११० पैकी १०८ किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. दुसरीकडे ८४ किलोमीटरपर्यंत हायड्रोलिक चाचणी यशस्वी झाली आहे. या कामाची पाहणी सोलापूर महापालिकेचे नूतन प्रशासक डॉ. सचिन ओंबासे यांनी केली.सोलापूर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत एनटीपीसी प्रकल्प आणि शासनाच्या मदतीने उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनी योजना पूर्णत्वास आली आहे. मात्र, शहरानजीक पाकणी येथील नवीन जलशुद्धीकरण केंद्रासाठी जागा उपलब्ध होण्यास अडचण निर्माण झाली आहे. संबंधित जागा वन खात्याच्या मालकीची असल्यामुळे त्याचा तिढा केंद्र सरकारच्या पातळीवर सुटू शकतो. मात्र, या संदर्भात महापालिका प्रशासनाने सुरुवातीपासून जलदगतीने पाठपुरावा केला नसल्याचे दिसून येते. या संदर्भात भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, महापालिकेचे नूतन प्रशासक, आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी प्रथमच उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामांची पाहणी केली. त्यांनी पाकणीच्या जुन्या जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पंपगृहाची माहिती घेतली. त्यानंतर उजनी जलाशयावरील पंपगृहासह संपूर्ण यंत्रसामग्री, जॅकवेल आणि उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनी उभारणीच्या कामाची पाहणी केली. या वेळी या प्रकल्पाचे मुख्य तांत्रिक अधिकारी तथा महापालिकेचे कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील, मक्तेदार पोचमपाड कन्स्ट्रक्शन कंपनीचे (हैदराबाद) प्रकल्प अधिकारी अरुण पाटील, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सहायक अभियंता उमर बागवान उपस्थित होते.

सोलापूर शहराला आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्याच्या उद्दिष्टाने उभारण्यात येत असलेल्या समांतर जलवाहिनी प्रकल्पात ११० पैकी १०८ किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित केवळ दोन किलोमीटरचे काम मार्चअखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.उजनी जलाशयावर उभारलेल्या नवीन पंपगृहात ११५० अश्वशक्ती क्षमतेचे सहा पंप बसविण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. या सर्व सहा विद्युतपंपांची पाणी उपशाची चाचणीही यशस्वी झाली आहे.या प्रकल्पामुळे शहराला १७० एमएलडी क्षमतेचा पाणीपुरवठा शक्य होणार आहे.

Story img Loader