लोकसत्ता प्रतिनिधी
सांगली : कोलकातामध्ये महिला डॉक्टरांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ अणि वैद्यकीय व्यवसायाला कायदेशीर संरक्षण मिळावे या मागणीसाठी शनिवारी सांगली, मिरजेसह तालुका पातळीवरील सर्व रुग्णालयात बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रात वैद्यकीय केंद्र म्हणून ओळख असलेल्या मिरजेतील रुग्णसेवा यामुळे ठप्प झाली होती. गेले चार दिवस निवासी डॉक्टरांच्या संपामुळे शासकीय रुग्णालयातील अतितातडीच्या शस्त्रक्रियावगळता अन्य शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करत दोषींना फाशीची शिक्षा करण्यात यावी, या मागणीसाठी शासकीय रुग्णालय व मिरज वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील ५०० हून अधिक डॉक्टर गेले चार दिवस संपावर आहेत. वैद्यकीय व्यवसायाला संरक्षण मिळावे या मागणीसाठी देशव्यापी इंडियन मेडिकल असोसिएशनने आज अत्यावश्यक रुग्णसेवा वगळून नियमित रुग्णतपासणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे सांगली व मिरज शहरातील ७००हून अधिक रुग्णालयांतील बाह्य रुग्ण विभाग आज बंद ठेवण्यात आला होता. या बंदला औषधविक्रेता संघटनेनेही पाठिंबा देत औषधविक्रीची दुकाने आज बंद ठेवली होती.
आणखी वाचा-पैठणमधील विद्यार्थ्यांना बिस्किटांमधून विषबाधा
मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णाालय व सांगलीतील शासकीय जिल्हा रुग्णालयात निवासी डॉक्टर संपावर असल्याने रुग्णसेवेवर परिणाम झाला असून अत्यंत तातडीच्या शस्त्रक्रियावगळता अन्य शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, बाह्य रुग्ण सेवेसाठी वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक उपचारासाठी उपलब्ध करण्यात आल्याचे सहायक अधिष्ठाता डॉ. रुपेश शिंदे यांनी सांगितले. रुग्णालयातील आंतररुग्ण विभाग सुरू असून, अत्यवस्थ रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. निवासी डॉक्टर संपावर असल्याने शासकीय रुग्णालयातील बाह्य रुग्ण सेवेवर परिणाम झाला असून, रुग्ण संख्याही रोडावली आहे. तथापि, रविवारी बाह्य रुग्ण विभाग सुरू ठेवण्यात येणार असून, सोमवारी रक्षाबंधनाची स्थानिक सुटी असल्याने हा विभाग बंद राहणार असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगिेतले.
दरम्यान, सांगली, मिरजेसह पलूस, जत, कवठेमहांकाळ, इस्लामपूर आदी ठिकाणीही खासगी रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग आज बंद ठेवण्यात आले होते.